Gold Price: सोन्याच्या वाढत्या दराने वधुपिता चिंताग्रस्त Pudhari
सांगली

Gold Price: सोन्याच्या वाढत्या दराने वधुपिता चिंताग्रस्त

विवाह हंगामाच्या तोंडावर झळ; लग्नाच्या तयारीतील वधू, वधूच्या कुटुंबांना आर्थिक ताण

पुढारी वृत्तसेवा
रजाअली पिरजादे

कडेगाव शहर : काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सतत वाढ होत आहे, तर ऐन लग्नसराईत ही दरवाढ सामान्य कुटुंबांना चांगलीच झळ देते आहे. विशेषतः लग्नाच्या तयारीत असलेल्या वधूसह वधूच्या कुटुंबांना आर्थिक ताण जाणवू लागला आहे. सोन्याचा दागिना आता परवडणारा राहिला नाही, अशी खंत अनेक पालक व्यक्त करत आहेत.

सोने भावाने अलीकडेच नवे उच्चांक गाठले. प्रति तोळा दर 1 लाख 30 हजार रुपयांवर स्थिरावल्यानंतर मागील आठवड्यात तो दर आणखी वाढला गेला आहे. या वेगाने वाढणाऱ्या दरामुळे विवाहासाठी आवश्यक असणारे सुवर्णहार, मंगळसूत्र, वाळ्या, अंगठ्या यांचा खर्च दुप्पट वाढला आहे. बाजारपेठेत विक्रेत्यांनीही ग्राहकांची कमतरता जाणवल्याचे सांगितले.

सोने दरवाढीमुळे मध्यमवर्गीय पालक सर्वात जास्त चिंतेत आहेत. मुलीच्या विवाहासाठी सोन्याची खरेदी हा आवश्यक खर्च मानला जातो. त्यामुळे सध्या धास्तावलेल्या वधुपित्यांना पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. काही कुटुंबांनी सोने खरेदीऐवजी भाडेतत्त्वावर दागिने घेण्याचा पर्याय निवडला आहे, तर काहींनी वजन कमी करून फक्त प्रतीक म्हणून दागिने बनवण्याचा मार्ग अवलंबला आहे, तर काही पालक लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचाही विचार करत आहेत.

दरम्यान, आर्थिक तज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता, डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांचा ओढा यातून सोन्याचे दर वाढत आहेत. पुढील काळातही दर स्थिर होण्याची चिन्हे कमी असल्याने ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. विवाह हा कुटुंबाचा आनंदाचा क्षण असतो. पण सोन्याच्या चढत्या भावाने या आनंदात चिंता मिसळली असून वधुपित्याच्या मनात ‌‘सोने की सोनेरी आठवणी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT