इस्लामपूर : मुख्यमंत्री फडणवीससाहेब उसाला टनाला सात हजार रुपये दर द्या, काटा मारणार्या कारखान्यांची नावे जाहीर करा, शेतकरी पूरग्रस्तांच्यासाठी टनाला 15 रुपये काय दीडशे रुपये द्यायला तयार आहेत, असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार बैठकीत बोलताना दिले.
रघुनाथ पाटील म्हणाले, सध्या टनाला पंधरा रुपये कपात व गळीत हंगाम सुरू करण्यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. पूरग्रस्त शेतकर्यांना मदत करायलाच हवी. मात्र ती शेतकर्यांच्या कडून वसूल करून करणे कितपत योग्य आहे. कारण सध्या उसाला मिळणारा दर हा उत्पादन खर्चाच्या मानाने खूपच कमी आहे. यापूर्वी दर दहा वर्षांनी उसाचा दर दुप्पट होत आला आहे. मात्र ज्यावेळी एस एम पी बंद होऊन एफ आर पी चा कायदा आला तेव्हापासून उसाचा दर वाढणे थांबले आहे. सध्या उसाला टनाला सात हजार रुपये भाव हवा होता. शेतकर्यांचे नेते शरद पवार यांनी राजू शेट्टी यांना हाताशी धरून उसाचा दर वाढू दिला नाही. त्या बदल्यात शेट्टी यांना आमदारकी व खासदारकी पवार यांनी बहाल केली आहे.
ते म्हणाले,आधीच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत असताना पुन्हा त्याच्या उसातून पंधरा रुपये कपात करणे कितपत योग्य आहे. कारण अनेक ऊस उत्पादक शेतकर्यांचेही अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्याच उसातून 15 रुपये कपात करण्याची भाषा करत आहेत. आधीच शरद पवार यांच्या निर्णयामुळे शेतकर्यांना टनाला दोन हजार रुपये कमी भाव मिळत आहे. सध्या उसाला साडेपाच हजार रुपये टनाला दर मिळायला हवा होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकर्यांच्या उसाची काटामारी करणार्या कारखानदारांची यादी आहे असे जाहीर केले आहे. यावेळी लक्ष्मण पाटील, आप्पासाहेब पाटील, शंकर मोहिते आधी उपस्थित होते.