इस्लामपूर : रेठरेधरण (ता. वाळवा) येथील बचाक्का मंदिर परिसरात माजी सैनिक विष्णू बाळू जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यानी 26 तोळे सोने, 92 हजाराची रोकड, असा सुमारे 27 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. सायंकाळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट दिली.
विष्णू जाधव यांचे रेठरेधरण-वाघवाडी रस्त्यालगत घर आहे. मंगळवारी सकाळी ते पत्नी सिंधू, सून कोमल यांच्यासह शेतात गेले होते. मुलगा विजय इस्लामपुरला गेला होता. दुपारी दोन वाजता ते शेतातून घरी आले. फाटक उघडून आत गेल्यानंतर त्यांंना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरात पाहिले असता कपाटातील साहित्य विस्कटले होते. कपाटातील सुमारे 26 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, 92 हजार रुपये रोकड चोरट्यानी लांबवली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठसेतज्ज्ञांनी नमुने घेतले. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. गुन्हे अन्वेषण शाखेची दोन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत.
चार ठिकाणी चोर्या, 40 तोळे सोन्याची लूट
चोरट्यांनी शिराळा तालुक्यातील फकीरवाडी, वाकुर्डे येथेही घरफोडी केली. वाकुर्डे येथे चंद्रकांत लक्ष्मण माने यांच्या घरातून दहा तोळे सोने व रोख सहा हजार रुपये, तर फकीरवाडी येथील पोपट महिपती देसाई यांच्या घरातून 7 तोळे सोने व 23 हजाराची रोकड पळवली. नायकलवाडी (ता. वाळवा) येथे घर फोडले. तेथे चोरट्यानी महिलेला दगड फेकून मारल्याचे समजते. त्यानंतर चोरट्यांनी रेठरेधरण येथील घरास लक्ष्य केले. चार ठिकाणी चोरट्यानी सुमारे 40 तोळे सोने लुटल्याची प्राथमिक माहिती आहे.