Rethare dam Pudhari
सांगली

Rethare dam: रेठरे धरण तलावात केवळ 9 टक्के साठा, 17 पाझर तलाव कोरडे

शिराळा तालुक्यात उसासह अनेक पिके धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 17 तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील रेठरे धरणातील पाणीसाठा केवळ 9 टक्क्यांवर आला असून उपयुक्त पाणी जवळपास संपले आहे. त्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे मोरणा धरणात 50 टक्के, शिवणी धरणात 32 टक्के, तर अंत्री धरणात 29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मोरणा धरणातील पाण्यावर सुमारे 495 हेक्टर ऊस व 438 हेक्टर रब्बी पिके अवलंबून आहेत. या धरणातून सात दिवस पाणी सोडले जाते व आठ दिवस बंद ठेवले जाते. मोरणा धरणातील पाण्यावर शिराळा, उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगाव व मांगले या गावांतील शेती अवलंबून आहे. तसेच शिराळा शहर व एमआयडीसीला देखील या धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

शिवणी धरणातील पाण्यावर शिराळा, खेड व शिवणी परिसरातील ऊस क्षेत्राला पाणीपुरवठा होतो. मात्र पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने ऊस व भाजीपाला पिके वाळण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची मागणी केली असली तरी पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. तालुक्यातील 49 पाझर तलावांपैकी 17 तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत, तर 24 तलावांतील पाणीसाठा 50 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात खालावली असून भाजीपाला व ऊस पिकांसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

करमजाई धरणात वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने 99 टक्के साठा झाला असून या पाण्याचा फायदा परिसरातील ऊस व रब्बी पिकांना झाला आहे. मात्र मोरणा व शिवणी धरणात या योजनेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT