Ishwarpur Municipal Council Pudhari
सांगली

Ishwarpur Municipal Council: ईश्वरपूर पालिका सभेत शास्ती कर माफीचा ठराव

गुंठेवारी नियमितीकरणास मुदतवाढ : दिव्यांगांना निधी

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : ईश्वरपूर शहरातील अवैध इमारतींवर लागू असलेला संपूर्ण शास्ती कर शासनाने माफ करावा, असा ठराव ईश्वरपूर नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते करण्यात आला. तसेच गुंठेवारी नियमितीकरणास मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेतला.

नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव यांच्या उपस्थितीत मंगळवारी पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात झाली. नगरपालिका निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्याच सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शास्ती कर माफीचा विषय ठेवला होता. नगराध्यक्ष मलगुंडे यांनी शहरातील मालमत्ता धारकांचा शास्ती कर शासनाने माफ करावा, असा ठराव मांडला.

ते म्हणाले, शास्ती करामुळे नगरपालिकेच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे शासनाने हा कर पूर्णपणे माफ करावा. याला नगरसेवक एल. एन. शहा यांनी अनुमोदन दिले. यावर शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार व भाजपचे राजवर्धन पाटील यांनी, असा ठराव आम्ही यापूर्वीच शासनाला पाठवला आहे. तुम्ही वेगळे काय केले? असा सवाल उपस्थित करत जनतेला आश्वासन दिल्याप्रमाणे पालिकेनेच शास्ती कर माफ केला पाहिजे, अशी भूमिका मांडली. यावर, तुम्ही सर्वांनी साथ दिली तर आम्ही तो शासनाकडून माफ करून आणतो, असे नगराध्यक्ष मलगुंडे म्हणाले.

नगरसेवक सुनील मलगुंडे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत शास्ती कर माफ करतो, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपला शब्द पाळावा. नगरसेवक संग्रामसिंह पाटील, शुभांगी शेळके, डॉ. संग्राम पाटील यांनीही चर्चेत भाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT