सांगली

विधवा प्रथेविरुद्ध बलगवडेत ठराव

अविनाश सुतार

मांजर्डे; पुढारी वृत्तसेवा : बलगवडे (ता. तासगाव) ग्रामपंचायतने मासिक सभेमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सरपंच सौ. जयश्री हरिराम पाटील यांनी दिली. शुक्रवार, दि.20 मे रोजी मासिक सभा झाली. असा ठराव करणारी बलगवडे ही सांगली जिल्ह्यातील पहिली, तर राज्यातील चौथी ग्रामपंचायत ठरली आहे.

मासिक सभेमध्ये ग्रामसेवक विजयकुमार पाटील यांनी विधवा प्रथेविरुद्धचा शासन निर्णय वाचून दाखवला. यास मीनाताई पाटील यांनी ठराव मांडला, तर सारिका बुधावले यांनी अनुमोदन दिले. सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. असा ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला जिल्ह्यातील ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत.

समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या नुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार 17 मे रोजी महाराष्ट्र शासनाने एक आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बलगवडे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला आहे.

या ठरावामध्ये म्हटले आहे की, गावामध्ये व राज्यामध्ये तसेच देशामध्ये विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, याकरिता विधवा प्रथा बंद करणेत येत आहे. यासंदर्भात महिला सहभागातून गावामध्ये जनजागृती करणेत येईल.

यावेळी सरपंच जयश्री पाटील म्हणाल्या, पतीच्या मृत्यूनंतर आजही समाजात महिलांना सन्मानाची वागणूक मिळत नाही.कार्यक्रमात सहभागी होता येत नाही,हळदी कुंकू लावता येत नाही, हातात बांगड्या घालता येत नाहीत.विधवा महिलांची अवस्था बिकट आहे.मात्र अश्या महिलांना सुद्धा समाजात मानसन्मान मिळाला पाहिजे यासाठी यापुढे आम्ही महिलांना विश्वासात घेऊन प्रयत्न करणार आहोत.
हा ठराव मंजूर करावा यासाठी अनिल पाटील यांनी पुढाकार घेतला. यावेळी उपसरपंच श्रीकांत मोहिते, माजी उपसरपंच उध्दव शिंदे, धनाजी शिंदे, महादेव माळी,सुवर्णा शिवाजी शिंदे, सचिन पाटील, सुर्यकांत थोरात, अजित जाधव उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT