कुपवाड : पुढारी वृत्तसेवा
तानंग (ता. मिरज) येथील नागरी वस्तीत एका मोबाईल कंपनीच्या टॉवरच्या बांधकामाविरोधात महिला, पुरुषांनी ग्रामसभेत आवाज उठविला. त्यामुळे हा टॉवर उभा करू नये, असा ठराव बहुमताने करण्यात आला. ग्रामसभेत ठराव होऊनही संबंधित मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
तानंग येथील एका मोबाईल कंपनीच्या टॉवर बांधकामाला यापूर्वी ग्रामपंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे संबंधिताने बांधकाम सुरू केले होते. हा टॉवर नागरी वस्तीत असल्याने या भागातील रहिवाशांना त्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुलांसह वयोवृद्ध स्त्री-पुरुषांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील असंख्य महिला, पुरुषांनी तानंग ग्रामसभेत आवाज उठविला. काही वेळ वातावरण गंभीर बनले होते. मोबाईल टॉवरचे बांधकाम तातडीने रद्द करण्यात यावे, असा ठराव सूचक नागेश किशन पाटील व अनुमोदक अमर रमेश मोरे यांनी मांडला.
या मोबाईल कंपनीच्या टॉवरचे बांधकाम बंद करण्यात यावे. यापूर्वी तानंग ग्रामपंचायतीने मोबाईल टॉवर कंपनीला दिलेला ना हरकत दाखला रद्द करण्यात यावा व यापुढे टॉवर उभारणीसाठी ग्रामसभेची मंजुरी मिळाल्याशिवाय ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. कोणत्याही मोबाईल कंपनीने परस्पर टॉवर उभा करू नये, असा ठराव बहुमताने संमत करण्यात आला. या टॉवरच्या बांधकामाला दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविणे उचित ठरेल, असे मत सरपंच व ग्रामसेवक यांनी व्यक्त केले.