सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील रिलायन्स ज्वेल्स सराफ पेढीवर पडलेल्या दरोडाप्रकरणी आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. या दरोड्यामध्ये बिहार आणि मध्य प्रदेशमधील टोळी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस दरोडेखोरांच्या मागावर आहेत. लवकरच त्यांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.
सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर रविवार, दि. 4 रोजी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. दरोडेखोरांनी गोळीबार करीत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि हिरे लुटून नेले होते. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील 12 हून अधिक पथके दरोडेखोरांच्या मागावर रवाना केली होती. सांगलीतील आठ पथकांसह कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकांचीही मदत घेण्यात येत आहे. त्यातील एक पथक बिहारमध्ये तळ ठोकून होते. या पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.
बिहारमधील रेकॉर्डवरील दरोडेखोरांची माहिती या पथकाकडून घेण्यात येत होती. यावेळी बिहार आणि मध्य प्रदेशमधील टोळी या दरोड्यामध्ये हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची जादा कुमकदेखील लवकरच बिहार आणि मध्य प्रदेशकडे रवाना होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.