सांगली : यंदाच्या गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. शहराबरोबरच ऊस पट्ट्यातील रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नाहीत. तसेच वाहने रस्त्यावर उभी केली जात आहेत. यामुळे जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. ऊस वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
प्रत्येक वर्षी गळीत हंगाम सुरू झाला की, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येतो. नियमांची पायमल्ली करून सुरू असणारी वाहतूक अन्य वाहनचालकांच्या जीवावर उठते. विशेषतः रात्रीच्यावेळी उसाने भरलेले ट्रॅक्टर रस्त्यावर बेधडकपणे उभे केले जातात. यातील अनेक वाहनांना रिफ्लेक्टर बसविले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी ही वाहने दिसत नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरला धडकून अपघात होत आहेत. गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी चालक शिकाऊ असल्याचे बोलले जाते. यामुळे अपघात होण्याची भीती आहे.
आतापर्यंत ऊस वाहनांना धडकून शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र अजून याबाबत ठोस उपायोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे यंत्रणेच्या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनाकडून नियमावली घालून देण्यात आली आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरतात. नफा कमावण्यासाठी बेकायदेशीरपणे अधिक ऊस भरला जातो. हा प्रकार जीवघेणा ठरत आहे.
एका लाईटवरच वाहने धावतात
ट्रॅक्टरला स्वतंत्रपणे ट्रॉली जोडण्यात येते. मात्र अनेक ठिकाणी ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसतो. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अपघातास ट्रॉलीसुद्धा कारणीभूत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेक भागात एका लाईटवरच ट्रॅक्टरचालक बेलगामपणे ट्रॅक्टर चालवतात. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
दिवसा आणि रात्रीच्यावेळी अनेक ठिकाणी रस्त्यावरच उसाने भरलेले ट्रॅक्टर लावले जातात. अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना धडक बसून जीवघेणे अपघात होत आहेत. अजून सुमारे दोन महिने ऊस वाहतूक सुरू असणार आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.