पलूस : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. या मजबूत नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अधिक सशक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शरद लाड यांनी आमच्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या विश्वासास पात्र राहू, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
मुंबई येथे मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मनोज घोरपडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार अमल महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, पृथ्वीराज पवार, राहुल महाडिक, अमोल बालवडकर, विराजसिंह माने, राजाराम गरुड उपस्थित होते.
शरद लाड म्हणाले, पूर्वी आमचा व भाजपामध्ये थोडा दुरावा होता. पण लोकसभा निवडणुकीदरम्यान समित कदम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यांच्या नेतृत्वगुणांनी आम्ही प्रभावित झालो. पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील युवक त्यांच्याकडे विकासाच्या आशेने पाहत आहेत. आमचे कुटुंब हे क्रांतिअग्रणी जी. डी. (बापू) लाड यांच्या सामाजिक कार्याचा वसा जपणारे घराणे आहे. येणार्या पदवीधर व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आम्ही भाजपच्या खांद्याला खांदा लावून काम करू. पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यात पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख यांच्यासोबत आम्ही भाजपचा झेंडा फडकवू.
घोषणाबाजी
कार्यक्रमास शरद लाड गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘शरद भाऊ लाड आगे बढो, हम तुम्हारे साथ है!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.