मिरज; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. संतोष चन्नाप्पा सिंदनखेरा (वय 36, रा. मांजरगाव, ता. हुमनाबाद, जि. बिदर, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. आकाश बाबूराव पाटील (वय 22, रा. बसवकल्याण, ता. हुमनाबाद, जि. बिदर), सूर्यकांत बेराडे (वय 30) आणि रवी सांगोलकर (वय 22, दोघे रा. बिदर, कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कर्नाटकातील बिदर येथून फरशी आणि अॅसिड वाहून नेणारे दोन ट्रक कोल्हापूरकडे निघाले होते. दोन्ही ट्रक रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मिरजजवळ एका पुलाच्या वळणावर एकत्र आले. संतोष सिंदनखेरा यांचा अॅसिड भरलेला ट्रक पुढे होता. बेराडे आणि सांगोलकर हे दोघे मागे फरशीने भरलेला ट्रकमध्ये होते. सिंदनखेरा यांचा ट्रक मिरज येथील राजीव गांधीनगरजवळ एका पुलावर वळण घेत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही ट्रक महामार्गाचा कठडा तोडून शेतामध्ये जाऊन पलटी झाले. अपघात झाल्याचे समजताच मिरज शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.