देवरुख/ईश्वरपूर : मार्लेश्वर (जि. रत्नागिरी) तीर्थक्षेत्र परिसरात डोंगरावरून दगड पडून ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, दि. १३ रोजी सकाळी घडली. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. ऋत्वी संदीप पाटील (वय ६, रा. कापूसखेड, ता. वाळवा) असे मृत बालिकेचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कापूसखेड येथील संदीप पाटील, प्रदीप पाटील या दोघा भावांसह कुटुंबीय मार्लेश्वर व गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले होते. कुटुंबातील ८ जणांचा समूह सकाळी मार्लेश्वर येथे दर्शनासाठी आला. मार्लेश्वराचे दर्शन घेऊन सर्व मंडळी धारेश्वर धबधब्याकडे गेली. येथे कुटुंबातील सर्व सदस्यांनी नदीतील पाण्यात हात-पाय धुतले, तर लहान मुलांनी धबधब्यात अंघोळीची मजा घेतली. यानंतर ही सर्व मंडळी परतीसाठी निघत होती. दरम्यान, सर्वजण नदी पार करून देवस्थान क्षेत्राकडे परतत असताना दुपारी १२ च्या सुमारास अचानक डोंगरावरून तीन दगड गडगडत वेगाने खाली आले. यातील एक दगड ऋत्वीच्या डोक्यावर पडला. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह सुरू झाला. त्याचवेळी दुसरा दगड ऋत्वीचे वडील संदीप यांच्या पायावर पडला. यात ते देखील जखमी झाले, तर तिसरा दगड ऋत्वीचे काका प्रदीप यांच्या हाताला व तोंडाला लागून खाली पडला. यात ते देखील जखमी झाले.
ऋत्वीला रक्तबंबाळ अवस्थेत तत्काळ नजीकच्या निवे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून पार्थिव सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास देवरुख पोलिस करत आहेत.
वाढदिवसानिमित्त देवदर्शनाचे नियोजन...
ऋत्वीचे वडील संदीप पाटील हे बडोदा (गुजरात) येथे नोकरीस आहेत. संदीप हे सुट्टीनिमित्त कुटुंबासह आपल्या कापूसखेड गावी आले होते. शुक्रवारी ऋत्वीचे चुलते प्रदीप यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त संदीप आणि प्रदीप यांनी गणपतीपुळे, मार्लेश्वर येथे कुटुंबासह देवदर्शनाला जाण्याचे नियोजन केले होते. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कापूसखेड येथून मोटारीने सर्वजण देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर मार्लेश्वर येथे दुपारी ही दुर्घटना घडली.
कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा...
कापूसखेड येथे रात्री उशिरा ऋत्वी हिचा मृतदेह आणण्यात आला. यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. रात्री उशिरा कापूसखेड येथील स्मशानभूमीत ऋत्वी हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋत्वी हिच्या पश्चात आई, वडील, मोठी बहीण अन्विता, चुलता, चुलती, दोन चुलत भावंडे, आजी असा परिवार आहे. ऋत्वीच्या अपघाती मृत्यूने कापूसखेडसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुरुंगामुळे डोंगराला भेगा
मार्लेश्वर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुंग लावले जात आहेत. यामुळे परिसरातील डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात भेगा पडू लागल्या आहेत. यामुळे डोंगरावरून दगड पडण्याच्या घटनाही वाढत आहेत. दगड पडण्याची ही तिसरी घटना असून, आता तरी या घटना थांबवण्यासाठी शासन लक्ष देणार का, असा सवाल मार्लेश्वर परिसरातील ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.