तासगाव शहर : पुढारी वृत्तसेवा
‘गणपती बाप्पा मोरया... मोरया... मोरया...’च्या जयघोषात रविवारी तासगावच्या गणपती पंचायतनच्या सिद्धिविनायकाचा 245 वा रथोत्सव संपन्न झाला. भर पावसात रथ ओढत असताना पावसासह गणेशाच्या भक्तीत भाविक चिंब न्हाऊन निघाले.
यंदाच्या रथोत्सवामध्ये लाखो भाविकांचा अलोट उत्साह पाहायला मिळाला. राज्यातून अडीच लाख भाविकांनी उत्सवासाठी उपस्थिती लावली. रविवारी दुपारी एक वाजून 23 मिनिटांनी रथोत्सवाला सुरुवात झाली. तत्पूर्वी मंदिरातून पालखीमधून श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती रथात आणण्यात आली. यावेळी दरवर्षीप्रमाणे तासगाव नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी गणरायाच्या पालखीला खांदा देऊन पालखी पुढे आणली.
गणेशमूर्ती रथामध्ये ठेवल्यानंतर आरती आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले. डॉ. आदिती पटवर्धन यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रचंड उत्साहात आणि मोरयाऽऽच्या जयघोषात 1 वाजून 23 मिनिटांनी रथयात्रा सुरू झाली. यावेळी पावसाने हजेरी लावल्याने लोकांमध्ये उत्साह वाढला होता. रथातून खोबरे, पेढे आणि गुलाल यांची प्रसाद म्हणून उधळण करण्यात येत होती.
रथोत्सवात खासदार विशाल पाटील यांनी राष्ट्रगीत म्हटले. माजी खासदार संजय पाटील यांनी गणेशाची आरती म्हटली. यावेळी दोघेही एकाच वेळी एकाच व्यासपीठावर आले होते. राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई तसेच प्रभाकर पाटील देखील उपस्थित होते. यानंतर काही वेळातच रोहित आर. आर. पाटील यांनी येऊन रथाचे दर्शन घेतले.