विटा : आमदार, खासदारांच्या उदासीनतेमुळेच गेली अडीच वर्षे तालुक्यातील विजापूर-गुहागर महामार्गाचे काम अपूर्ण आहे, रेवणसिद्ध घाट रस्त्यावरील अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खानापूर तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी केला.
विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 इ वरील रेवणसिद्ध घाटात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष पंकज दबडे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस राज लोखंडे, विवेक भिंगारदेवे, दीपाली लांब, लालाशेठ पवार आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी दबडे म्हणाले, रेवणसिद्ध घाट, रेवणगाव घाट, सुलतानगादे आणि नागज घाट या ठिकाणचा हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. काहींना कायमचे अपंगत्व आले, अनेकांचे जीव जात असताना लोकप्रतिनिधी आणि महामार्गाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. महामार्गावरील खड्ड्यांचे काम तातडीने पूर्ण करा, अन्यथा महामार्गाचा भाग असलेला हा रस्ता उखडून टाकू, असा इशारा दबडे यांनी दिला.
संदीप ठोंबरे म्हणाले, रेवणसिद्ध नाथांच्या मंदिराकडे हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्याचबरोबर खराब रस्त्यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थिनींचे अतोनात हाल होत आहेत. हा रस्ता दुरुस्त करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेऊन आंदोलनाची भूमिका घेतली होती. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी नेहमीच या विषयाकडे चालढकल करीत असल्यामुळे शेवटी आज पुन्हा आम्ही रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याचे काम कधी होणार, हे कळल्याशिवाय आंदोलन स्थगित न करण्याचा इशारा ठोंबरे यांनी दिला.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे बिराजदार यांनी जानेवारीअखेर रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले. यावेळी राज लोखंडे, विवेक भिंगारदेवे, दीपाली लांब, सुनील तुपसौंदर्य, अजित चव्हाण यांचीही भाषणे झाली.
आंदोलनात तालुका उपाध्यक्ष आबा जाधव, शहराध्यक्षा वैशाली विभुते, नंदा शिंदे, कविता घाडगे, जिल्हा उपाध्यक्षा विद्या गायकवाड, सुहास कुलकर्णी, सामराई तुंबगी, संजय काळे, आदित्य पाटील, प्रतीक धनवडे, अक्षय साठे, रोहित कांबळे, लालाशेठ पवार, मुकेश जगताप, सोमनाथ जाधव, त्र्यंबक तांदळे, प्रथमेश साळुंखे, महेश कणसे, महेंद्र लोंढे, संदीप देवकुळे, अमोल मंडले, सुधीर कांबळे, प्रवीण दबडे, ऋषी दिवटे, शुभम सुर्वे, दीपक जंगम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.