सांगली

Bamani archaeological discovery: बामणी येथे आढळले सातवाहनकालीन दुर्मीळ अवशेष

ऐतिहासिकदृष्ट्या परिसराचे संशोधन होणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

नेवरी : खानापूर तालुक्यातील विट्यापासून 14 कि.मी.वर असणाऱ्या बामणी (पारे) गावात सातवाहनकालीन वस्तीचे महत्त्वपूर्ण अवशेष इतिहास अभ्यासकांना आढळून आले. यापूर्वीही या परिसरात सातवाहनकालीन व त्यानंतरच्या काळातील अवशेष मोठ्या प्रमाणात सापडले असून नेर्ले (ता. वाळवा) येथे सातवाहनकालीन दगडी पाटा उपाळे (मायणी, ता. कडेगाव) या ठिकाणी सातवाहनकालीन दगडी जाते सापडले होते. त्याच परिसरातील म्हासुर्णे (ता. खटाव) येथे 1960 च्या दशकात आढळलेली त्रिकुटक साम्राज्याची सापडलेली चांदीची 6 नाणी, यावरून या परिसरात प्राचीन वसाहतीची ठिकाणे असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर प्राचीन इतिहासाच्यादृष्टीने अत्यंत समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

विटा परिसरात निरीक्षण करत असताना इतिहास अभ्यासक संजय पाटील (नेर्ले) व सुहास शिंदे, जयराम स्वामी, वडगाव यांना बामणी (ता. खानापूर) येथील बबलू पाटील व बालाजी पाटील यांच्या घराच्या आवारात सातवाहनकालीन तीन वेगवेगळ्या प्रकारचे दगडी जात्यांचे अवशेष आढळून आले. हे अवशेष वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यावरून सातवाहनकालीन वस्तीच्या स्वरूपावर महत्त्वाचा प्रकाश पडणार आहे. याच निरीक्षणादरम्यान पाटील यांच्या वाड्यात सुमारे 300 वर्षे जुने, रचनात्मकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असे धान्याचे कोठार (अंबारी) आढळून आले. त्याचा स्वतंत्र अभ्यास सुरू आहे.

दक्षिण महाराष्ट्राला प्राचीन आणि गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. कोल्हापूर व कराड परिसरात या इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आजही दिसून येतात. ही गावे तत्कालीन इंडो-रोमन व्यापारी मार्गावर वसलेली होती. मागील काही दिवसात नेर्ले या ठिकाणी सातवाहनकालीन दगडी पाटा व उपाळे मायणी येथे सातवाहनकालीन दगडी जाते शोधण्यात संजय पाटील यांना यश मिळाल्यानंतर या संपूर्ण भागातील ऐतिहासिक अवशेषांचा शोध अधिक वेगाने सुरू झाला आहे.

या परिसरामध्ये भविष्यात सखोल संशोधन व शास्त्रीय उत्खनन होणे अत्यंत आवश्यक असून, तसे झाल्यास दक्षिण महाराष्ट्राच्या दुर्मीळ व समृद्ध इतिहासाचे अनेक नवे पैलू उलगडतील. यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य मोलाचे आहे.
- संजय पाटील, इतिहास अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT