मिरज : आम्ही राजकारणात कधीही फोडण्याचे नाही, तर नेहमी जोडण्याचे काम करतो, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मिरजेत दिले.
उद्योजक अशोक खाडे यांना 'पद्मश्री' पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. हा सत्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे खासदार आता आमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आम्ही आता फक्त तीनच खासदार शिल्लक ठेवले आहेत. भविष्यात आणखी कोण कोण आमच्यासोबत येणार आहेत, हे सांगता येत नाही.
आठवले पुढे म्हणाले, 'दलित पँथर'पासून अशोक खाडे माझे मित्र आहेत. आमदार सुरेश खाडे हेदेखील सुरुवातीला माझ्याच पक्षात होते. त्यांचा संघर्ष मी पाहिला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही खाडे यांच्या उद्योग विश्वातील कामगिरीचा गौरव केला. सोहळ्याला उद्योजक मिलिंद कांबळे, खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुहास बाबर, आमदार सदाभाऊ खोत, संजय पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेते पृथ्वीराज पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, युवा नेते सुशांत खाडे, मकरंद देशपांडे, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक निरंजन आवटी, तानुबाई खाडे, सुमन खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.