सांगली : चंद्रदर्शनानंतर रमजानला रविवार, २ मार्चपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त शहरातील मशिदींमध्ये तयारी सुरू आहे. शहर परिसरात उपवास सोडण्यासाठी फळे, खजूर व शेवया विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत.
रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे केले जातात आणि अल्लाहची प्रार्थना (इबादत) केली जाते. रमजान संपल्यानंतर 'ईद-उल्-फित्र' साजरी केली जाते. चंद्रदर्शन झाल्यानंतर शनिवारी रात्रीपासूनच तरावीहच्या नमाजला प्रारंभ होत आहे. रमजानदरम्यान, सहेरी, रोजा (उपवास) इफ्तार, नमाज असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी पहाटे फज्रची नमाज अदा केल्यानंतर पहिल्या रोजाला प्रारंभ होईल. सूर्योदयापूर्वी सहेरी (उपवासाला प्रारंभ), तर सूर्यास्तानंतर रोजा इफ्तारी (उपवास सोडणे) केली जाते. हलाल समितीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसारच रोजाची सहेरी तसेच रोजा इफ्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती ईदगाह मशिदीचे इमाम हाफीज सद्दाम सय्यद यांनी दिलीय.
शहरात बाहेरगावाहून आलेले, गरजवंत, रुग्णांचे नातेवाईक, वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आदींसाठी मोफत सहेरीसाठीच्या जेवणाची व्यवस्था मदनी ट्रस्टकडून करण्यात आली आहे. यासाठी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत नाव नोंदणी आवश्यक आहे. यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट, पाकीजा मस्जिदसमोर, शंभरफुटी रोड, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन हाफिज सद्दाम सय्यद यांनी केले आहे.