इस्लामपूर : ज्या वयात मुलं पाय टाकायला शिकतात, त्या वयात राजवर्धिनीनं आभाळ मुठीत धरलं आणि तेही 5 हजार 400 फूट उंचीवर जाऊन. अवघ्या 1 वर्ष 11 महिने 15 दिवसांच्या चिमुकल्या राजवर्धिनीनं फक्त सांगली जिल्ह्याचीच नाही, तर महाराष्ट्राची मान आणि शान वाढवली. सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करून एक नवा इतिहास तिने रचला. हे शिखर सर करणारी ती देशातील सर्वात कमी वयाची ट्रेकर ठरली.
सांगली जिल्ह्यातील वाळवा हे मूळ गाव असलेली आणि सध्या पुण्यात राहणारी दोन वर्षांची राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिच्या या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये तब्बल दोनवेळा झाली. शिखरावर पोहोचल्यानंतर तिने आणि वडिलांनी तिरंगा फडकावून आनंद साजरा केला. कळसुबाई शिखर, ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते, ते सर करणे अनुभवी ट्रेकर्ससाठीही आव्हान असते. हे शिखर चढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारीची आवश्यकता असते.
तिच्या ट्रेकिंगच्या प्रवासाची सुरुवात 24 ऑक्टोबर 2024 रोजी झाली, जेव्हा तिने पहिला सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यावेळी तिचे वय 1 वर्ष 7 महिने 5 दिवस होते. कुटुंबीयांनी तिला सिंहगडावर नेले असता, कडेवरून खाली उतरून तिने चालायला सुरुवात केली आणि बघता - बघता संपूर्ण सिंहगड किल्ला तिने सर केला! आतापर्यंत राजवर्धिनीने स्वराज्यातील नऊ महत्त्वाचे किल्ले सर केले आहेत. यामध्ये सिंहगड, शिवनेरी, रायगड, केंजळगड, रायरेश्वर, भूषणगड, मल्हारगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड यांचा समावेश आहे.
राजवर्धिनीच्या यशामागे तिचे वडील प्रसाद विठ्ठल चव्हाण आणि आई अमिता प्रसाद चव्हाण यांची प्रेरणा आहे. प्रसाद अनुभवी ट्रेकर असून, त्यांनी आजवर चारशेवर ट्रेक्स पूर्ण केले आहेत. त्यांची उल्लेखनीय मोहीम म्हणजे पुण्याहून रायगडापर्यंतची चालत जाणारी कठीण वाटचाल. यात त्यांनी सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा (बोराट्याची नाळ) असे दुर्गम टप्पे पार केले. प्रसाद यांनी राजवर्धिनीला दहाव्या महिन्यात रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळाजवळ नेले. तिच्या आयुष्यातील सर्वात पहिली माती तिच्या हाताला लागली, तीही महाराजांच्या पवित्र समाधीस्थळी.
छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राजवर्धिनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. यावर्षीच्या हिंदवी स्वराज्य संकल्प दिनाच्या निमित्ताने रायरेश्वर येथे झालेल्या विशेष सोहळ्यात अभिषेकाचा यजमान पदाचा मान राजवर्धिनीला मिळाला होता.
कळसुबाई शिखर सर केल्यानंतर वडील प्रसाद चव्हाण यांच्यासमवेत हात उंचावताना ट्रेकर राजवर्धिनी.