सांगली ः साखर कारखाने बंद होत असताना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदारांनी उतार्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत केली.
ते म्हणाले, मागीलवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे उसाच्या उत्पन्नात घट झाली. त्यामुळे उसाचे उत्पन्न घटले असताना साखर उताराही घटल्याचे निदर्शनास येत आहे. साखर कारखाने बंद होत असताना सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदारांनी उतार्यात घट दाखवून साखर चोरल्याचा संशय आहे. तयार झालेली साखर हिशेेबात दाखवलेली नाही. याविरोधातही संघटना आवाज उठविणार आहे. आंदोलन उभारणार आहे. शेतकर्यांना न्याय मिळवून देणार आहे.
शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने एकरकमी एफआरपीबाबत तयार केलेला कायदा राज्य सरकारला बदलता येत नाही. परंतु तत्कालीन महाविकास आघाडीने कायद्यात बदल केला. ऊस उत्पादक शेतकर्यांना एकरकमी एफआरपीचा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या न्यायालयीन लढाईमध्ये केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांमध्ये राज्य सरकारला अधिकार नसताना बेकायदेशीररीत्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड केल्याचे म्हणणे मांडले होते. ते म्हणाले, राज्यातील सर्व पक्षांतील कारखानदारांनी मिळून केलेल्या षड्यंत्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमधून न्याय मिळाला. कारखानदारांना चारीमुंड्या चीत करण्यात ऊस उत्पादक शेतकर्यांना यश आले. या निर्णयाने राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना एकरकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावेळी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.