सांगली

Raju Shetti | ...अन्यथा साखर कारखाने बंद पाडणार

माजी खासदार राजू शेट्टी यांचा बुधगाव येथील सभेत इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : कारखान्यांना दर द्यायला परवडत नाही, मग एक एक कारखानदार सतरा-अठरा कारखाने कसा काय चालवू शकतो. साखर कारखाने तोट्यात नाहीत, तर फायद्यात आहेत. कारखान्यांचे अर्थकारण शेतकऱ्यांना सांगू नका. ज्या कारखान्यांची रिकव्हरी 3400 च्या वर आहे, त्या कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा. जे कारखानदार हा दर देणार नाहीत, ते कारखाने बंद पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी बैठकीत बोलताना दिला.

बुधगाव (ता. मिरज) येथे ऊस दर आणि शक्तिपीठ महामार्ग याबाबत बुधगाव गावभागातील दत्त मंदिराच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला प्रमुख वक्ते म्हणून राजू शेट्टी यांच्यासह माजी खासदार संजय पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख महेश खराडे, शेतकरी युवा नेते संदीप राजोबा, संजय बेले माजी पंचायत समिती उपसभापती विक्रम पाटील, प्रवीण पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

आमच्या रेट्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत भूमिका बदलली असून नव्या बदलानुसार सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्ह्यांना वगळून हा महामार्ग तयार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. आमची मागणी ही तीन जिल्हे नाही, तर सर्वच्या सर्व बारा जिल्हे वगळण्यात यावेत. ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होणार नाही, आम्ही तो होऊ देणार नाही. नागपूर - रत्नागिरी हा महामार्ग असताना नवीन शक्तिपीठ महामार्गाची काय गरज आहे? नागपूर - रत्नागिरी हा महामार्ग सहा किंवा आठपदरी करा, त्यातील मधले दोन मार्ग एक्स्प्रेस हायवेच्या धर्तीवर तयार करा, त्याला आमची कोणतीही हरकत नाही. याच महामार्गाचे टोलचे पैसे अपेक्षेप्रमाणे वसूल होत नसताना, पुन्हा दुसरा महामार्ग कशासाठी, असा प्रश्न शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना दर द्यायला परवडतो, मग सांगली जिल्ह्यात काय अडचण आहे? सांगलीमध्येही 3400 च्या वर रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याने एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा अन्यथा आम्ही सांगली जिल्ह्यातील कारखाने बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. येत्या 12 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहत असून त्यानंतर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. महेश खराडे, बजरंग पाटील, संदीप राजोबा यांचीही भाषणे झाली. मनोहर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आनंदराव पाटील, विलास पाटील, रामदास पाटील, शेखर पाटील, पी. के. इंगळे, बाळासाहेब पाटील, अधिकराव पाटील उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT