Raju Shetti  Pudhari
सांगली

Raju Shetti| ५५०० रुपये उचलीसाठी कारखाने बंद पाडणार..!

माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज काटा बंद आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर :ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पहिली उचल ५५०० रुपये मिळावी आणि ऊसदराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऊसदर जाहीर न करताच सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाल्याच्या निषेधार्थ, आज, गुरुवारी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखाने बंद पाडण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन ५५०० रुपये पहिली उचल देण्याची ठाम मागणी केली आहे. मात्र, कारखान्यांनी कोणतीही स्पष्ट घोषणा न करताच हंगाम सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे. यापूर्वीच संघटनेने अनेक ठिकाणी ऊसतोडी रोखल्या असून, काही ठिकाणी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडण्याच्या व टायर फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही कारखान्यांनी गतीने गाळप सुरू ठेवून उसाची पळवापळवी सुरू केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

कर्नाटकातील कोंगनोळी येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन बुधवारी तूर्तास स्थगित करण्यात आले. त्यानंतर आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुरू झालेले साखर कारखाने पूर्णपणे बंद पाडण्यासाठी आंदोलनाची नवीन दिशा निश्चित केली आहे. त्यानुसार ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनेचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होणार आहेत.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे.

मोठे कारखाने लक्ष्य...

आंदोलकांनी सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रमुख कारखान्यांना लक्ष्य करण्याची भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेतली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन अधिकाधिक तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT