Raju Shetti File Photo
सांगली

Raju Shetti| साखरेची आधारभूत किंमत ५०, इथेनॉलचा दर ७० करा

राजू शेट्टी; २९ सप्टेंबरला केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिकिलो ५० रुपये करावी, तसेच इथेनॉलचा दर किमान ७० रुपये प्रतिलिटर करावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ईश्वरपूर येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, देशात साखरेची मागणी वाढली असून साखरेची गरज भागवण्याची जबाबदारी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांतील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगावर आहे. दसरा व दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढत असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र, १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू केल्यास सुरुवातीच्या काळात उसाची साखरेची रिकव्हरी कमी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे साखर कारखान्यांचे तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. रिकव्हरी कमी झाल्यास शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपी व अंतिम दरावरही परिणाम होणार आहे.

नऊ वर्षांपासून आधारभूत किंमत ३१ रुपयेच

शेट्टी म्हणाले, गेल्या नऊ वर्षांपासून साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिकिलो ३१ रुपये इतकीच स्थिर आहे. या काळात उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना साखरेच्या दरात मात्र अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे साखरेची किमान आधारभूत किंमत प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर किमान ७० रुपये केल्यास कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकेल.

१५ दिवस गावा-गावात जनजागृती मोहीम

या आंदोलनात वाळवा व शिराळा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी पुढील १५ दिवस गावोगावी बैठका घेऊन तीव्र जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT