Raju Shetti | कृष्णा-वारणाकाठ ‘शक्तिपीठ’ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार : राजू शेट्टी  File Photo
सांगली

Raju Shetti | कृष्णा-वारणाकाठ ‘शक्तिपीठ’ महामार्गामुळे उद्ध्वस्त होणार : राजू शेट्टी

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील 30 गावांना महापुराचा फटका

पुढारी वृत्तसेवा

सांगली : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गातील सांगलीवाडी ते कोथळी, दानोळी वारणा व कृष्णा नदीवर होणार्‍या भरावासह पुलांमुळे सांगली शहरासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील 30 हून अधिक गावांना महापुराचा फटका बसणार आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला शक्तिपीठ महामार्ग कृष्णा-वारणाकाठ उद्ध्वस्त करणार आहे, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाच्या कोथळी व दानोळी येथून वारणा नदीवरून जाणार्‍या रस्त्यामुळे होणार्‍या भविष्यातील पूरपरिस्थितीबाबत शक्तिपीठच्या संभाव्य मार्गावर जाऊन पाहणी केली. सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्ग प्रवेश करत असताना कृष्णा व वारणा या दोन नद्यांना ओलांडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे. वास्तविक पाहता या मार्गावर दानोळीकडे अडीच ते तीन किलोमीटर व समडोळी, सांगलीवाडीकडे पाच किलोमीटर असा जवळपास 8 किलोमीटर महापुराच्या पाण्याचा फुगवटा असतो. यामुळे महापुरात जवळपास दीड महिना पात्राबाहेर या भागात पाणी रेंगाळत असते.

कृष्णा व वारणा नद्यांच्या पाण्याचा फुगवटा सांगलीवाडी येथून ते चिकुर्डेपर्यंत जाणार आहे. मुळातच रत्नागिरी-नागपूर या महामार्गाच्या उमळवाड-अंकली येथे होणार्‍या पुलामुळे मोठा भराव केला जाणार आहे. यामुळे महापुरात पाणी पुढे सरकण्यास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. सध्या कृष्णाकाठ व वारणाकाठावरील गावांमध्ये क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढून उत्पन्नात मोठी घट आली आहे. गेल्या महिन्याभरापासून संततधार सुरू असलेल्या पावसाने वारणा व कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने शेतातील पाणी निचरा होण्यास अडथळे येत आहेत.

शक्तिपीठ महामार्गाच्या या भरावामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी, कोथळी, हिंगणगाव, कुंभोज, कवठेसार, नरंदे, खोची, भेंडवडे, लाटवडे, किणी, घुणकी, चावरे, निलेवाडी, पारगाव, तर सांगली जिल्ह्यातील समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, बागणी, शिगाव, कोरेगाव, कणेगाव, तांदुळवाडी, चिकुर्डे या गावांना सर्वाधिक फटका बसणार आहे. यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील शेती व्यवसायाबरोबरच साखर उद्योगाला याचा मोठा फटका बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT