सांगली : गोकुळ दूध संघावर घटनाबाह्यरित्या तज्ज्ञ संचालक नेमून सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. गुजरातच्या अमूल दूध संघाला गोकुळ देण्याचे हे षडयंत्र आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, निकाल महायुतीच्या हातातून गेला म्हणून सरकारने सहकार कायदा बदलला. ५०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या संस्थांवर कब्जा मिळविण्यासाठी ५ शासकीय सदस्य बेकायदेशीररित्या नेमण्याचा निर्णय केला. शेतकऱ्यांचा कौल नाकारण्याचा प्रकार असून, लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहोत.
गोकुळ दूध संघ गुजरातच्या 'अमूल'च्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. गोकुळमध्ये २० लाख लिटर दूधाचे संकलन होते. गोकुळमध्ये अमूलनंतर सर्वाधिक दूध संकलन होते. यावर आता नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे.