सांगली : शक्तिपीठ महामार्ग 65 हजार कोटी रुपये जादा खर्चून करण्यात येणार असून, यातून सत्ताधाऱ्यांना 2029 ची निवडणूक लढवायची आहे. यातील मलई लाटण्यासाठी याचे समर्थन केले जात आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आणि महापुराला निमंत्रण देणारा हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे. महसूल आणि पोलिस बळाचा वापर करून हा महामार्ग करण्यात येत असेल, तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा आणि परभणी येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व यातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्यावतीने कुटुंबीयांसमवेत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टरसह मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी चार पोलिस निरीक्षकांसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी उमेश देशमुख, सतीश साखळकर, दिगंबर कांबळे, संदीप राजोबा, जिल्हा परिषद सदस्या कल्पना येडके आदी उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले की, नाशिक-अक्कलकोट महामार्ग करण्यात येत आहे. यामध्ये मोठमोठे डोंगर असतानाही यासाठी प्रति कि.मी. 51 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. शक्तिपीठ महामार्गासाठी मात्र 124 कोटी रुपये प्रति कि.मी. खर्च आहे. एकूण 1 लाख 5 हजार कोटी रुपये खर्चून शक्तिपीठ करण्यात येत आहे. यामध्ये 65 हजार कोटी रुपये अधिक खर्च आहे. यातील वाटा लोकप्रतिनिधींच्या खिशात जात आहे. या पैशातूनच 2029 ची निवडणूक लढवण्यात येणार आहे. या महामार्गातून काही तरी चिरीमिरी मिळेल, म्हणून त्याचे काहीजणांकडून समर्थन करण्यात येत आहे. महापुराला निमंत्रण देणारा हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. पोलिस प्रशासनाकडून बळाचा वापर करून याविरोधातील आंदोलन मोडण्यात येत आहे. हे थांबले नाही, तर याला जशास तसे उत्तर देण्यात येईल.
यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शक्तिपीठ आपल्या जिल्ह्यातील एकोणीस गावांमधून जात आहे. बाधीत होणाऱ्या या गावांतील बहुतांशी शेतकऱ्यांनी, हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी मान्य करून या महामार्गाचे रेखांकन बदलत असल्याचे जाहीर केले आहे. पण रेखांकन बदल केला तरी, समांतर महामार्ग राहणारच आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गच रद्द केला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सांगली आणि परिसरातील महापुराचा धोका वाढणार आहे. बागायत असलेली शेती अधिग्रहित होणार आहे. शेताच्या मध्यातून महामार्ग गेल्यामुळे शेतीचे दोन भाग होणार आहेत. यासारख्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांपुढे काही प्रश्न तयार होणार आहेत. त्यामुळे कसल्याही परस्थितीत हा महामार्गच रद्द झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे.
मोर्चाची सुरुवात राममंदिर चौकातून होऊन मोर्चा पुष्पराज चौक, विश्रामबाग आदी मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चामध्ये प्रवीण पाटील, अधिक पाटील, अनिल डुबल, संग्राम पाटील, घन:शाम नलवडे, उमेश येडके, यशवंत हारुगडे, भूषण गुरव, सुनील पवार, विष्णू पाटील, रघुनाथ पाटील, एकनाथ कोळी आदी सहभागी झाले होते.