दिघंची : येथील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव कोरडा पडला आहे. Pudhari Photo
सांगली

माणदेशाला वरदायी राजेवाडी तलाव कोरडाच

पुढारी वृत्तसेवा

दिघंची : शिवानंद क्षीरसागर

माणदेशाला वरदान ठरणारा ऐतिहासिक ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव अद्याप कोरडा ठणठणीत आहे. त्यामुळे माणदेशी शेतकरी कमालीचा चिंतेत आहे. सन 2020 ते 2022 या साली सलग तीन वर्षे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर मात्र तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. यावेळी देखील तलावाच्या सिंचन क्षेत्रात जोरदार पाऊस झाला नसल्याने तलाव कोरडा ठणठणीत आहे. यावर्षी जोरदार पाऊस पडून हा तलाव भरणार का, याकडे माणदेशातील शेतकर्‍यांचे लक्ष आहे.

राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाखालील सुमारे 44 हजार 208 एकर क्षेत्र प्रत्यक्षपणे ओलिताखाली येते, तर सुमारे दीड लाख एकर क्षेत्राला अप्रत्यक्षपणे लाभ होतो.यावेळी तलावाच्या 480 चौरस मैल पाणलोट क्षेत्रात अद्याप मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली नाही. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास या भागातील दुष्काळ हटेल, अशी येथील शेतकर्‍यांची धारणा आहे.

हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आटपाडी तालुक्यातील राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी, दिघंची, उंबरगाव तसेच सांगोला तालुक्यातील खवासपूर, कटफळ, महूद, चिकमहूद, अचकदाणी, लक्ष्मीनगर या गावांचे 44 हजार 208 एकरापेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते. त्याचप्रमाणे माणगंगा नदीकाठच्या लिंगीवरेपासून खालच्या कोल्हापूर पद्धतीच्या सात बंधार्‍यांना याचा लाभ मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सुमारे अडीच हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्राला प्रत्यक्षपणे, तर त्याहून अधिक क्षेत्राला अप्रत्यक्षपणे लाभ होतो. सध्या माण तालुक्यातील जिहे कठापूर योजनेचे पाणी माण नदीत सोडले आहे. ते म्हसवडमधून पुढे राजेवाडी तलावात येते. सध्या पाणी म्हसवडमध्ये येण्यास आणखी तीन ते चार दिवस लागतील, अशी माहिती आहे.

हक्काचे पाणी द्या...

जिहे कठापूर योजनेचे हक्काचे पाणी राजेवाडी तलावात सोडावे, अशी मागणी आटपाडी तालुक्यातील जनतेतून अनेक वर्षांपासून होत आहे. योजनेत राजेवाडी तलावाचा समावेश करून वर्षातून दोनवेळा हा तलाव भरल्यास लाभक्षेत्रात असणार्‍या गावांतील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT