ईश्वरपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाच्या अंतिम बिलापोटी उर्वरित ४ कोटी ७६ लाख २३ हजार ३१२ रुपयांची रक्कम दिवाळीनिमित्त गुरुवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.
कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव-सुरूल आणि कारंदवाडी या तीन युनिटमध्ये गत हंगामात एकूण १३ लाख ६० हजार ६६६ टन उसाचे गाळप करण्यात आले. तिन्ही युनिटमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण ४६८ कोटी ७५ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. त्यातील उर्वरित ४ कोटी ७६ लाख रुपयांची रक्कम दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जमा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कारखान्याचा सन २०२६-२७ चा गळीत हंगाम सुरू झाला असून, सर्व ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, संतोष खटावकर उपस्थित होते.