सांगली/लिंगनूर : सांगली, मिरज शहर परिसरात तुरळक, तर मिरजपूर्व भागातील मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, व्यंकोचीवाडी पायापाचीवाडी आदी परिसरात काल दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान सुमारे पाऊण तास मुसळधार पाऊस पडला.
सांगली शहर व परिसरात दुपारी कडक ऊन पडले होते. परंतु सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान काही भागात तुरळक पाऊस झाला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता, तर मिरजपूर्व भागात दुपारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रानात ठिकठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. ठिकठिकाणी चिखल साचला होता. काल सकाळपासून मिरजपूर्व भागात ऊन पडले होते. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर काल एरंडोली परिसरात हा पाऊस पडला. मात्र पूर्व भागातील शिपूरच्या पुढे बेळंकी, सलगरे, चाबुकस्वारवाडी या भागाला मात्र काल पावसाने हुलकावणी दिली.