सांगली ः सांगलीसह परिसरात शुक्रवारीही पाऊस सुरूच होता. सकाळपासूनच रिपरिप सुरू झाली. दुपारनंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली होती. संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, खरीप हंगामाची तयारी करायची असल्याने, पाऊस कधी उघडणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष आहे.
पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाला. बारानंतर पावसाने उघडीप दिली. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. मिरज पश्चिम भागातही रिपरिप पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत अडीच फुटाने वाढ झाली. या भागात पावसाचा जोर कायम असल्याने शेतात पाणी साचून राहिले. शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकर्यांचा खटाटोप सुरू होता. या पावसाचा फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे. खानापूर, तासगाव, जत तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली, त्यामुळे शेतकरी पुन्हा कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.
चांदोली धरण परिसरात काल तिसर्या दिवशीही पावसाची संततधार कायम होती. गेल्या 24 तासात 47 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. शेडगेवाडी-चांदोली रस्त्यावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत, तर काळुंद्रेजवळ झाड कोसळले आहे. चरणच्या सोंडोली पुलाजवळही भलेमोठे झाड तुटून पडले होते. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती, काल ती पूर्ववत झाली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीची कामे खोळंबली आहेत. संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दहा टक्के पाणीसाठा यंदा धरणात अधिक आहे. मे महिन्यात पावसाळ्यासारखा पाऊस पडून धरणाची पाणी पातळी वाढण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
खरीप हंगामाची तयारी शेतकरी सध्या करीत आहेत. मात्र जोरदार पाऊस झाल्याने आता मशागती करण्यास अडथळा येणार आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यानंतरच हंगामाची तयारी करता येणार आहे.