सांगली : अजून रीतसर उद्घाटन व्हायचे आहे, तोवर चिंतामणीनगर रेल्वे पुलाची अवस्था खराब झाली आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आणि लगेच पुलाला खड्डे पण पडले. लोकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यावर एकदा या खड्ड्यांत मातीच्या पाट्या टाकल्या गेल्या, पण दोन दिवसात पुन्हा खड्डे ‘जैसे थे’ झाले. आता तर हे खड्डे जिवावर बेतण्याची भीती आहे. पूल बांधून हात वर करणारे आणि त्यानंतर पुलाची जबाबदारी असणारे, अशा दोन्ही यंत्रणांना याचे सोयरसुतक नाही.
सांगली शहरातील चिंतामणीनगर, सह्याद्रीनगर, विश्रामबाग रेल्वे उड्डाण पूल... सार्याच पुलांवरील रस्त्यांची वारंवार दुरवस्था होते आहे. चिंतामणीनगरचा पूल तर नवा कोरा. अजून उद्घाटनही न झालेला, पण या पुलाचा वाली कोण? त्याचाच पत्ता लागत नाही. सारा पूलच एकमेकांकडे टोलवला जातो आहे. रेल्वे विभाग लक्ष देत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो आमच्याकडे देखभाल दुरुस्ती नाही आणि महापालिका म्हणते अॅप्रोच रस्ता आमच्याकडे आहे, पण पुलाचा भाग आमच्यात येत नाही. आम्ही नेमक्या तक्रारी करायच्या कोणाकडे? असा विचित्र सवाल जागरुक नागरिकांना पडला आहे. अजितदादा पवार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत थेट जिल्हाधिकार्यांनाच निवेदन दिले आहे.
विटा-सांगली हा राज्य महामार्ग. त्याची अवस्था भयंकर बिकट आहे. रोज हजारो वाहनांची ये-जा असतानाही हा रस्ता तासगावपासून सांगलीपर्यंत धोकादायक ठरत आहे. चिंतामणीनगरच्या पुलावर आल्यावर हे धोके जास्तच गंभीर होतात. पुलावर दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. वाहने जाऊन जाऊन खड्डे आणखी खोल होत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूला अजूनही विजेची सोय केलेली नाही. पूल बांधला की काम झाले. पुढच्या सोयींची जबाबदारी घ्यायला विभाग जागेवर नाही. सारा पूल अंधारात आहे. त्यात जीवघेणे खड्डे. समोरून येणार्या वाहनांंच्या दिव्यांचा प्रखर झोत वाहनधारकांच्या डोळ्यांवर पडतो आणि तोवर गाडी वेगात खड्ड्यात जाते. येथे मोठ्या अपघाताची भीती आहे.
अंडरपास रस्त्यांचा पत्ता नाही
चिंतामणीनगर रेल्वे पुलाच्या अवतीभोवती अनेक उपनगरे आहेत. या उपनगरांसाठी पुलाच्या खाली बोगद्यातून अंडरपास रस्ते तयार करायचे होते, पण त्याची साधी चर्चासुध्दा नाही. उपनगरांमधून पुलावर येताना किंवा पुलावरून गाड्या खाली वळवताना अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत.
चिंतामणीनगर रेल्वे पूल रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. पुलावर अद्यापही विजेची व्यवस्था नाही. दोन्ही बाजूचे सेवा रस्ते नाहीत. जिल्हाधिकार्यांनी महानगरपालिका, रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी निवेदन दिले आहे.- पद्माकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष.