बेळंकी हद्दीत बोगद्यात ब्रेक थ्रू 
सांगली

Radhakrishna Vikhe Patil : देवाभाऊंमुळेच दुष्काळी भागाला पाणी

राधाकृष्ण विखे-पाटील : बेळंकी हद्दीत बोगद्यात ब्रेक थ्रू : लोकांनी व्हिडीओ पाहून केला जल्लोष

पुढारी वृत्तसेवा

लिंगनूर : दुष्काळी भागाला पाणी देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकतात. आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हैसाळ योजनेच्या विस्तारित योजनेसाठी अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 1995 साली युती काळात आणि 2014 पासून देवाभाऊ यांच्या नेतृत्वात योजनेला भरघोस निधी मिळाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी केले.

बेळंकी हद्दीतील जानराववाडी रस्त्यालगत असणाऱ्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा 2.60 मीटर अंतरातील ब्रेक थ्रू ब्लास्ट कार्यक्रम काल जलसंपदामंत्री पाटील यांच्या हस्ते कळ दाबून झाला. त्याची लाईव्ह स्क्रीन व्यवस्था सभागृहात केली होती. त्यामुळे बोगद्यातील स्फोट ब्रेक थ्रू स्क्रीनवर पाहून जत तालुक्यातील लोकांनी टाळ्या, शिट्या वाजवून जल्लोष केला. या ब्रेक थ्रूनंतर आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते.

ते म्हणाले, वसंतदादांची आज पुण्यतिथी आहे. दादांनी आयुष्यभर संघर्ष केला. दादा डगमगले नाहीत. आमचे दादा घराण्याशी जुने संबंध. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनी कृष्णा खोरेची स्थापना युती काळात केली होती. युती काळात म्हैसाळ योजनेच्या विकासाची सुरुवात झाली असून योजना आता पूर्णत्वास येत आहे. 2014 पासूनच खरी चालना योजनेस मिळाली आहे. कालवा स्वच्छता आणि पाणी पोहोचविणे याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. दुष्काळी भागात नवचैतन्य येत आहे. खात्याच्या अधिकाऱ्यांनो पाण्याचे नियोजन चांगले करा. कालव्यात झाडे नकोत, ते स्वच्छ करा, अडथळे दूर करा, शेवटपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, असे आदेश दिले आहेत. गोपीचंद यांनी जत तालुका दत्तक घेतला आहे. जतकडे जाणाऱ्या तिसऱ्या लाईनसाठी मंजुरी देऊन टाकू, बोर नदीवर बॅरेज मंजूर करू, असेही मंत्री पाटील यांनी आश्वस्त केले.

यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दुष्काळाचा भूतकाळ व्हावा, ही जत तालुक्याची मागणी पूर्णत्वास जात आहे. वंचित 65 गावांसाठी सुवर्णअक्षरांनी लिहावा असा दिवस आज आहे. बोगद्याचे शेवटचे ब्लास्टिंग आज झाले. यामुळे जत तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. 350 ते 400 क्युसेकने पाणी तालुक्याला दिले पाहिजे. आणखी एक ज्यादा तिसरी लाईन टाकली, तरच क्षमतेने पाणी मिळेल अशी मागणी केली. 600 कोटी नाबार्डमधून मिळावेत, नव्या अर्थसंकल्पात निधी मंजूर करून ही कामे व्हावीत. डिसेंबरपर्यंत 18 तलावांत पाणी जाईल. बोर नदीवर बॅरेजेस आवश्यक आहेत. साठवण तलाव दुरुस्ती, नवीन तलावांची गरज आहे, असेही नमूद केले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, 1983-84 मध्ये योजनेला मंजुरी वसंतदादांच्या काळात मिळाली होती. निधी कमी पडत असताना, जल आयोगाची मान्यता घेऊन केंद्राच्या वेगवर्धित सिंचन योजनेतून 1000 कोटी निधी तत्कालीन केंद्रीय मंत्री बंधू प्रतीक पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला होता. लवकर व पूर्ण क्षमतेने पाणी देण्याबाबत खात्याने जल आयोगाकडे प्रस्ताव देऊन नियोजन करावे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक हेमंत धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सदाभाऊ खोत, भाजप महिला आघाडीच्या सुमन खाडे, भाजप युवा नेत्या स्वाती खाडे, जिल्हा परिषद माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT