सांगली : महापालिकेचे कामकाज, त्याबाबतचा अनुभव, अधिकारी, कर्मचारी उपस्थिती याबाबत नागरिकांनी अभिप्राय द्यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने ‘क्युआर कोड’ सुविधा उपलब्ध केली आहे. महापालिकेच्या प्रत्येक विभागाच्या दालनाबाहेर ही सुविधा आहे. क्युआर कोड स्कॅन करून अभिप्राय देता येणार आहे.
शंभर दिवस गतिमान प्रशासन अभियानअंतर्गत महापालिकेने क्युआर कोडद्वारे अभिप्राय नोंदवण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. नागरिक आणि कर्मचारी, अधिकारी यांच्या समन्वयातून प्रशासन गतिमान करण्यासाठी हा नवा उपक्रम राबविण्यात येत आहे. आता नागरिकांनी क्युआर कोड स्कॅन करून विभाग प्रमुखांबाबत किंवा विभागाबाबत थेट आयुक्तांकडे अभिप्राय पाठविता येणार आहे. सर्व विभागांच्या दालनाबाहेर क्युआर कोड लावण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह सर्व विभागात क्युआर कोड सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी महापालिकेच्या कोणत्याही विभागास भेट दिल्यानंतर तेथील अनुभव, कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थितीबाबत तसेच अधिकारी, कर्मचारी यांची वागणूक याबाबत क्युआर कोडवरून अभिप्राय देता येणार आहे. त्याची नोंद आयुक्त घेणार आहेत. त्यानुसार त्या विभागांचे मूल्यमापन केले जाणार आहे.