वांगी : गटारीचे ढासळू लागलेले काँक्रिट दगड लावून लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. तसेच गटारीवरील झाकणे गायब आहेत.  pudhari photo
सांगली

पुसेसावळी-वाकुर्डे रस्त्याचे रखडलेले काम ‘रामभरोसे’

वांगीतील ग्रामस्थ धुळीने वैतागले : सिमेंट काँक्रिटच्या गटारीवर दगडमातीचे पॅचवर्क

पुढारी वृत्तसेवा

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे पुसेसावळी वाकुर्डे रस्त्याचे गेल्या वर्षभरापासून रखडलेले काम एकदाचे सुरू झाले म्हणून धूळ व गैरसोयीला वैतागलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला, पण सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे सुरू असलेले काम पाहून कपाळावर हात मारून घ्यायची वेळ आली आहे.

वांगी येथे सुरू असलेले पुसेसावळी ते वाकुर्डे रस्त्याचे काम सुरू होऊन एक वर्ष उलटले तरी अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच स्थानिक रहिवासीदेखील धूळ व गैरसोयीमुळे त्रस्त आहेत. गावात प्रवेश करणारे मुख्य रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व वाहनधारक वैतागले आहेत. सध्या येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर ना पोत्यांचे आच्छादन आहे ना रस्त्यावर पाणी मारले जात आहे. त्यामुळे रस्ता कोरडा पडला आहे, असे चित्र सध्या आहे. रस्त्याच्या कामावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांत नाराजी आहे.

रस्त्यावर टाकलेले कोरडे काँक्रिट वाहने जाऊन विखरू लागले आहे. रस्त्याच्या कडेला बांधलेले गटारीचे काम काही ठिकाणी अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ते आताच ढासळू लागले आहे. जिल्हापरिषद शाळेच्या गेटसमोरच्या गटारीच्या चेंबरवरील झाकणे गायब आहेत. त्यामुळे लहान मुले व पादचार्‍यांसाठी रस्त्याकडेने चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

गटारीच्या चेंबरवरील निकृष्ट दर्जाची झाकणे तुटून गटारात पडत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्याचे काम रामभरोसेच सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. प्रशासनाविरुध्द संताप व्यक्त करत आहेत. रस्ता व गटारीचे काम दर्जेदार करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT