जेजुरी अपघातातील जखमी शैलजा जगताप यांचे निधन 
सांगली

Jejuri Accident : जेजुरी अपघातातील जखमी शैलजा जगताप यांचे निधन

कवलापूर गावावर शोककळा; मृतांची संख्या ४ वर

पुढारी वृत्तसेवा

सांगली : आळंदी ते पंढरपूर पायी वारी जात असताना जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या कवलापूर (ता. मिरज) येथील शैलजा दिनकर जगताप (वय ५७) यांचे बुधवारी रात्री पुण्यात उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेमुळे कवलापूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या ४ वर पोहोचली आहे.

जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव ट्रक घुसल्याने झालेल्या अपघातात सांगली जिल्ह्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर शैलजा जगताप यांच्यासह अन्य काही वारकरी गंभीर जखमी झाले होते. अपघातामध्ये शैलजा जगताप यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण, उपचारादरम्यान बुधवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

​शैलजा जगताप या श्री शिवगणेश मंडळ, कवलापूरचे सदस्य संतोष दिनकर जगताप यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघातात कवलापूर येथील नंदा पवार यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता शैलजा जगताप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कवलापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आईची इच्छा पूर्ण केली; पण...

शैलजा यांच्या पतीचे निधन पूर्वीच झाले आहे, तर मोठ्या मुलाचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. घरात एक मुलगा आणि त्या, असे दोघेच राहत होते. पायी वारी करण्याची त्यांची अनेक दिवसांपासून इच्छा होती. मुलगा संतोष हे आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन गेला होता; मात्र अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT