कुपवाड : चिखली, पुणे येथील विवाहितेचा 20 लाखांसाठी सासरकडून मारहाण करून शारीरिक, मानसिक छळ केल्याची घटना घडली. पल्लवी प्रमोद मडके (वय 21, सध्या रा. गणेशनगर, बामणोली. मूळ रा. म्हैत्रे सोसायटी, पार्वती कॉम्प्लेक्स, चिखली, पुणे) असे विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवी यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात पती, सासू, नणंद या तिघांविरोधात फिर्याद दिली आहे.
पती प्रमोद रामराव मडके (वय 29), सासू सुलक्षणा रामराव मडके (वय 60, दोघे रा. म्हेत्रे सोसायटी पार्वती कॉम्प्लेक्स चिखली, पुणे), नणंद प्रतिभा विलास आगलावे ( वय 41, रा. कृष्णानगर, चिखली, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फिर्यादी पल्लवी या सासरी चिखली येथे राहत असताना, 17 मे ते 9 जून 2025 या कालावधीत पती प्रमोद याने मारहाण केली. तसेच ‘नवीन वाहन घेण्यासाठी माहेरहून वीस लाख रुपये घेऊन ये’, अशी मागणी केली. तसेच सासू सुलक्षणा हिने पल्लवीला मारहाण केली. लग्नात घातलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. नणंद प्रतिभा आगलावे हिने पल्लवीला ‘तुम्ही लग्नामध्ये वाहन दिले नाही, तसेच नीट पाहुणचार केला नाही’, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.