सांगली : ‘नवीन वर्ष, नवीन दिशा अन् नवीन प्रवास’ हा मंत्र घेऊन सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या ‘गगन टूर्स’ प्रस्तुत ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन २०२६’, पॉवर्ड बाय ‘अ हेवन हॉलिडे’ या भव्य पर्यटन प्रदर्शनाची काल, रविवारी उत्साहात सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला सांगलीसह जिल्हाभरातून पर्यटक आणि नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेषतः कालचा रविवार अक्षरशः पर्यटन नियोजनाचा रविवार ठरला. अनेकांनी आपल्या आगामी सहलींचे नियोजन करीत थेट बुकिंगचाही लाभ घेतला.
महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांपासून देशातील लोकप्रिय पर्यटन केंद्रे आणि जगभरातील आकर्षक पर्यटनाच्या संधींपर्यंत विविध पर्यायांची माहिती पर्यटकांना एकाच छताखाली उपलब्ध झाली. ‘कुठे जायचे?’, ‘कसे जायचे?’ आणि ‘किती खर्चात जायचे?’ या पर्यटन नियोजनातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर विविध पर्यटन कंपन्यांच्या स्टॉलवर मिळत असल्याने प्रदर्शनाला विशेष पसंती मिळाली. पर्यटनस्थळांची निवड, प्रवासाचा कालावधी, टूर पॅकेजेस, वाहतूक व्यवस्था, निवासाची सुविधा, खर्चाचे नियोजन, तसेच विशेष ऑफर्स याबाबत पर्यटकांना थेट माहिती मिळाली.
‘पुढारी न्यूज’, ‘पुढारी ऑनलाईन’ आणि ‘टोमॅटो एफएम आपलं एफएम’ यांच्या व्यापक प्रसिद्धीमुळे ‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन’ हे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. पर्यटक, पर्यटन कंपन्या आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध घटकांना एकत्र आणण्यात या प्रदर्शनाने महत्त्वाची भूमिका बजावली.
सुटीच्या नियोजनाला नवी दिशा
कुटुंबासोबत परदेशवारी, मित्रमंडळींसोबत साहसी पर्यटन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी सहली, धार्मिक पर्यटन, निसर्गभ्रमंती किंवा हनिमून डेस्टिनेशन... प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार विविध पर्यटन पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध होते. त्यामुळे पर्यटकांना आपल्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडणे अधिक सोपे झाले.
एकाच छताखाली सारी माहिती
संपूर्ण जिल्ह्यातून पर्यटकांनी प्रदर्शनाला भेट दिली. ‘सारी माहिती एकाच छताखाली’ उपलब्ध होत असल्याने वेळ, श्रम आणि स्वतंत्रपणे माहिती शोधण्याची धावपळ वाचल्याची भावना पर्यटक आणि नागरिकांनी व्यक्त केली. नव्या वर्षातील सुट्या व सहलींचे नियोजन करण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली.
पर्यटन कंपन्या-पर्यटकांतील विश्वासाचा सेतू
‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन’ हे केवळ पर्यटकांसाठीचे प्रदर्शन न राहता, संपूर्ण ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचे व्यावसायिक व्यासपीठ म्हणूनही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. सहलीचे नियोजन करणारी कुटुंबे, विविध ग्रुप्स आणि पर्यटन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये थेट संवाद घडवून आणणारा प्रभावी दुवा म्हणून या प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित झाले. पर्यटन कंपन्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची, तर पर्यटकांना विविध पर्यायांची एकाच ठिकाणी तुलना करून निर्णय घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे कंपनी आणि पर्यटक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त झाली.
‘ऑन द स्पॉट’ ऑफर्सला पसंती
प्रदर्शनातील विविध पर्यटन कंपन्यांनी आकर्षक टूर पॅकेजेस आणि विशेष सवलती जाहीर केल्या होत्या. थेट प्रतिनिधींशी संवाद साधून पॅकेजेसची माहिती घेणे, आपल्या गरजेनुसार त्यात बदल सुचविणे आणि ‘ऑन द स्पॉट’ बुकिंग करणे, ही सुविधा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरली. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या अनेकांनी माहिती घेण्याबरोबरच आपल्या आगामी सहलींचे बुकिंगही केले.