सांगली : 'करुणाष्टके' या प्राजक्त देशमुख लिखित आणि दिग्दर्शित अत्यंत गाजलेल्या नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रभावी नाटकाच्या दमदार प्रयोगाला रसिकांनी दाद दिली.
येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्योत्सवाचे मुख्य प्रायोजक मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढी असून 'एलआयसी' आणि येवलेज मिल्क कॉर्नर हे सहयोगी प्रायोजक आहेत. माई ह्युन्दाई, सांगली यांचे विशेष सहकार्य लाभले . 'करुणाष्टके' हे नाटक सोमवारी सादर करण्यात आले. हे नाटक १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातील नाशिकमधील एका वाड्यात राहणाऱ्या सात विधवांच्या संघर्षावर आणि त्या काळातील स्त्रीजीवनावर भाष्य करणारे होते.
यामध्ये गीतांजली कुलकर्णी, पर्ण पेठे, कल्याणी मुळे, किरण खोजे, केतकी सराफ, प्रतीक्षा खासनीस यांसारख्या दिग्गज अभिनेत्री आणि विनायक चव्हाण यांसारख्या दिग्गज अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारल्या. यावेळी पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीचे मिलिंद दादा गाडगीळ, एलआयसी ऑफ इंडिया सांगली शाखेचे व्यवस्थापक संतोष चौधरी, महेश कुलकर्णी यांचा सत्कार पुढारीचे शाखा व्यवस्थापक युवराज पानारी यांच्याहस्ते करण्यात आला. कलाकारांचा सत्कार मिलिंद दादा गाडगीळ, संतोष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी पीएनजी पेढीचे संचालक गणेश गाडगीळ आणि त्यांचे कुटुंबीय, सांगली पुढारी आवृत्तीचे निवासी संपादक सुरेश गुदले आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ९१.९ आपलं एफ एमचे आर. जे. शरद यांनी केले.