इस्लामपूर : दै. पुढारी आणि प्रतिराज युथ फौंडेशनच्या येथे सुरू असलेल्या शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हलची मंगळवारी अलोट गर्दीच्या साक्षीने सांगता झाली. पाच दिवसात या महोत्सवात लाखोंची उलाढाल झाली. त्यामुळे व्यावसायिकांतूनही समाधान व्यक्त होत होते. हा महोत्सव शहर व परिसरातील नागरिकांसाठी खरेदी व मनोरंजनाची पर्वणीच ठरला. शिवाय ग्रामीण भागातील प्रेक्षकांना नामवंत मराठी कलाकारांशी संवादही साधता आला.
दै. पुढारी आणि प्रतिराज युथ फौंडेशनच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. चितळे श्रीखंड सहयोगी, तर प्राजक्ता इन्स्टिट्युट पार्लर अँड क्लिनिक हे फेस्टिव्हलचे सहप्रायोजक होते. शुक्रवारी सुरू झालेल्या या फेस्टिव्हलची मंगळवारी सांगता झाली. गेले चार - पाच दिवस या महोत्सवात खरेदीसाठी शहर व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत होती. त्यामुळे महोत्सवात लाखोंची उलाढाल झाली. शिवाय अनेक नवउद्योजकांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची संधीही यानिमित्ताने मिळाल्याने व्यावसायिकांतून समाधान व्यक्त होत होते. मुख्य प्रायोजक प्रतिराज युथ फाऊंडेशनचे संस्थापक खंडेराव जाधव, सातारा जिल्हा वूमन्स को-ऑप. एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव, प्राजक्ता इन्स्टिट्युटच्या संगीता शिंदे, प्राजक्ता शिंदे उपस्थित होत्या. शिवाय अनेक मान्यवरांनी या फेस्टिव्हलला भेट दिली.
फेस्टिव्हलच्या समारोपाला मंगळवारी रात्री झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवासमधील कलाकार अक्षया देवधर (भावना गवळी) व कुणाल शुक्ल (सिध्दिराज गाडेपाटील) हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारत मनोरंजन केले. तसेच येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँण्ड अॅक्टिव्हिटी सेंटरच्या बालचमूंनी किड्स टॅलेंट शोच्या माध्यमातून उपस्थित प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. त्यांच्या कलाविष्काराला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. विनोद मोहिते व वर्षा मोहिते यांनी निवेदन केले.
या फेस्टिव्हलमध्ये पहिल्या दिवसापासून उपस्थित प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. फॅशन शो व मिस कस्तुरी इस्लामपूर स्पर्धाही पार पडली. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यामुळे फेस्टिव्हलची उंची आणखी वाढली.