इस्लामपूर : दै. पुढारी आणि प्रतिराज युथ फौंडेशनच्यावतीने येथे सुरू असलेल्या शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हलमध्ये चौथ्या दिवशीही गर्दीचा ओघ सुरूच होता. आज (मंगळवारी) या फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. गेले चार दिवस हा महोत्सव शहर व परिसरातील नागरिकांसाठी खरेदी व मनोरंजनाची पर्वणी ठरत आहे. सोमवारी रात्री साक्षी क्लबच्या कलाकारांनी हिंदी-मराठी गाण्यांची मैफिल रंगवत उपस्थितांचे मनोरंजन केले.
दै. पुढारी आणि प्रतिराज युथ फौंडेशनच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. चितळे श्रीखंड सहयोगी तर प्राजक्ता इन्स्टिट्युट पार्लर अॅण्ड क्लिनीक हे फेस्टिव्हलचे सहप्रायोजक आहेत. शुक्रवारी या फेस्टिव्हलला दिमाखात सुरुवात झाली, तर मंगळवारी समारोप होणार आहे. खरेदीसाठी शहर व परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शिवाय दररोज नामवंत मराठी कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. खरेदीबरोबरच विविध पदार्थांची मेजवानी व मनोरंजन एकाच छताखाली होत असल्याने हा महोत्सव सर्वांच्या आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. सोमवारी रात्री साक्षी क्लब प्रस्तुत ‘बरसात सुरांची’ हा बहारदार कार्यक्रम पार पडला. वंदना कांबळे, अरफान शेख, श्वेता लके, दीपक कोठावळे यांनी हिंदी-मराठी गाण्यांची मैफिल रंगवत चांगलेच मनोरंजन केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली.
फेस्टिव्हलचा आज (मंगळवारी) समारोप होणार आहे. सायंकाळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मी निवासमधील कलाकार अक्षया देवधर (भावना गवळी) व कुणाल शुक्ल (सिध्दीराज गाडेपाटील) हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
ते उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. शिवाय मुक्तांगण प्ले स्कूल अॅण्ड अॅक्टिव्हिटी सेंटर प्रस्तूत किड्स टॅलेंट शो (मुक्त आविष्कार) होणार आहे.