सांगली; पुढारी वृत्तसेवा : पुढारी माध्यम समूह व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे होणार्या 'पुढारी अॅग्रीपंढरी' या प्रात्यक्षिकयुक्त लाईव्ह कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारीपासून चार दिवस हे प्रदर्शन विजयनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे कृषी विभागाच्या जागेत होत आहे.
प्रदर्शनाचे यंदाचे चौथे वर्ष असून शेतकर्यांना 50 हून अधिक पिकांचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनात दोनशेहून अधिक कंपन्या त्यांचे उत्पादन घेऊन सहभागी होत आहेत. ऑर्बिट क्रॉप न्यूट्रिएंट हे प्रदर्शनाचे टायटल प्रायोजक, तर रॉनिक होम अॅप्लायसेन्स व कन्हैया अॅग्रो हे सहप्रायोजक आहेत. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नवनवीन बी-बियाणे, खते, औषधे येत आहेत. त्यांचा वापर कसा करावा, त्याचे फायदे, त्याचे होणारे परिणाम या प्रदर्शनात शेतकर्यांना पाहण्यास मिळणार आहेत. वातावरणातील बदल, पाणीटंचाई व निरनिराळे व्हायरस यामुळे शेती क्षेत्रातील बदल व संशोधन शेतकर्यांपर्यंत जाणे गरजेचे बनले आहे. त्या पार्श्वभूमीवर 'दैनिक पुढारी'तर्फे हे लाईव्ह कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. शेतीतील नवनवीन शोध प्रदर्शनाच्या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. कृषी विभागाच्या जागेत 50 हून अधिक पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट तयार झाले आहेत. त्याशिवाय प्रदर्शनात ठिबक सिंचन, अत्याधुनिक रोपण, निरनिराळे बी-बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, रोपण पद्धती, सोलर पंप, तुषार सिंचन, शेततळे कागद, शेडनेट, शेती अवजारे, ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, फवारणी यंत्रे, तयार नर्सरी व पशुपालन व्यवसायातील विविध अवजारे, पशुखाद्य, मत्स्यपालनासाठी शेततळे, कुक्कुटपालनातील खाद्यसामग्री, शासनाच्या विविध योजना, विविध पिके व फळझाडांची नर्सरी अशा विविध घटकांची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी संपर्क : बाळासाहेब 9850556009.
प्रदर्शनात पिकांचे प्लॉट तयार केले आहेत. त्यात झेंडूमध्ये कोलकात्ता व झेंडू ड्रीम यलो, वांगे काटेरी व कुडची चमक (कृष्णाकाठ), भेंडी – साहिबा, टोमॅटो, वरणा- पावटा, कोबी, पिवळा फ्लॉवर, घेवडा, दुधी भोपळा, दोडका, नागा दोडका, काकडी- हिरवी व पांढरी, जुकेनी हिरवी व पिवळी, कारले पांढरे व हिरवे, बिन्स, कलिंगड यासह अनेक पिकांचा समावेश आहे.
शेतकर्यांनी माती व पाण्याचे नमुने प्रदर्शनामध्ये दिल्यास ऑर्बिट लॅबोरेटरीकडून मोफत परीक्षण करून देण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रत्येक शेतकर्याला हमखास बक्षीस मिळणार आहे.