मांजर्डे : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तासगाव पंचायत समितीच्या आमसभेचे आयोजन सोमवार (दि. 26) रोजी करण्यात आले आहे. या आमसभेला खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.
तासगाव तालुक्यातील विसापूर व मांजर्डे जिल्हा परिषद गटातील 21 गावांचा समावेश खानापूर मतदारसंघात आहे. या 21 गावांतील जनतेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या गावात पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, भूमिअभिलेख, ग्रामपंचायत, वनविभाग, पाटबंधारे, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम, महसूल, अन्न व औषध यासह अन्य विभागांबाबत समस्या आहेत. अनेक गावांत विकास दुर्लक्षित असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेचे आमदार सुहास बाबर करत आहेत. या भागातील समस्यांची त्यांना जाणीव आहे. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. 21 गावांतून अनेक प्रश्न, अडीअडचणी आमसभेत विचारण्यात येणार आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आमदार सुहास बाबर उपस्थित राहणार का? याची उत्सुकता आहे.
आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांच्यात आर. आर. पाटील व अनिल बाबर यांच्यापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही आमदार अनेक कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत शिवसेना भागीदार आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गट विरोधक म्हणून भूमिका बजावत आहे. तासगाव तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकत्र येऊन पक्षीय मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राजकीयदृष्ट्या जागरूक असणार्या तासगाव तालुक्यात पंचायत समितीची आमसभा यापूर्वी 2001 मध्ये झाली होती. त्यानंतर चालू वर्षी म्हणजे तब्बल 24 वर्षांनी आमदार रोहित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा होत आहे. यामुळे सभा कशी होणार, कोणकोणत्या प्रश्नांची चर्चा होणार, याबाबत उत्सुकता आहे.
खानापूरचे आमदार सुहास बाबर यांना आम्ही आमसभेचे निमंत्रण दिले आहे. ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आहे. उपस्थितीबाबत अजून आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही.किशोर माने, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तासगाव