Sangli Municipal Corporation Pudhari Photo
सांगली

Sangli News: घरपट्टी वाढली; रोष उमटू लागला

व्यापारी संघटना आक्रमक : नोटिसीमधील अटी, 21 दिवसांची मुदत रद्दची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी नोटिसांचे वाटप सुरू आहे. अनेक मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांच्यातून रोष उमटू लागला आहे. व्यापारी एकता असोसिएशननेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. हरकती, आक्षेपांसाठी नोटिसीमधील कागदपत्र पूर्ततेच्या अटी, तसेच 21 दिवसांमध्येच हरकत, आक्षेप दाखल करण्याची अट रद्द करण्याची मागणीही होऊ लागली आहे.

महापालिका प्रशासनाकडून कर योग्य मूल्य/भाडेमूल्यावर आधारित घरपट्टी आकारली जात होती. या करपद्धतीतील भाड्याने दिलेल्या मालमत्तांवरील 58 टक्के करामुळे संबंधित मालमत्ताधारकांमध्ये प्रचंड रोष होता. दरम्यान, महापालिका प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 लाख 8 हजार मालमत्ताधारकांना नोटीस दिली जात आहे. नोटीस प्राप्त होईल तसे नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही नागरिकांची घरपट्टी कमी झाली आहे. त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अनेक मालमत्ताधारकांच्या घरपट्टीत वाढ झाली आहे.

कार्पेट एरियाऐवजी बिल्ट-अप एरियावर घरपट्टी आकारणी केली आहे. बिल्ट-अप एरियामुळे करपात्र क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे घरपट्टीची रक्कमही वाढली आहे. त्यामुळे कार्पेट एरियाच घरपट्टीसाठी ग्राह्य धरावा, अशी मागणीही होत आहे. वाढलेल्या घरपट्टीमुळे अनेक नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांकडे येत आहेत.

व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, प्रमुख बाजारपेठेत मालमत्ता कर दुप्पट, तिप्पट झाला आहे. त्यामुळे मोठा रोष निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने हरकती, आक्षेप दाखल होणार आहेत. मात्र हरकती दाखल करण्यासाठी अनेक कागदपत्रे मागितली जात आहेत. गेल्यावर्षी घरपट्टी भरल्याची पावती, बांधकाम परवाना, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, भाडे नोंदणी करार, उतारा आदी अनेक कागदपत्रे सादर करण्याची अट आहे. ही अट रद्द करावी. नोटीस मिळाल्यापासून 21 दिवसात हरकत दाखल करण्याची अटही रद्द करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT