सांगली : येथील गावभागातील 69 वर्षीय वृद्धाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेने या रुग्णाच्या संपर्कातील 5 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत. गावभागात सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या शोधमोहिमेसाठी सर्वेक्षण सुरू केले आहे, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.
गावभाग येथील या व्यक्तीला 10 जुलैरोजी ताप व सर्दी आली होती. त्याच्यावर खासगी डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले. त्यांना शुगर आणि रक्तदाब आहे. त्यांना 12 जुलै रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबई येथील खासगी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. 15 जुलै रोजी चाचणी अहवाल प्राप्त झाला. तपासणीचा अहवाल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. खासगी रुग्णालय व्यवस्थापनाने हा अहवाल 16 जुलै रोजी महापालिकेला पाठवला.
स्वाईन फ्लूबाधीत रुग्णाच्या घरी त्यांची पत्नी आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मुंबईतील खासगी प्रयोगशाळेकडे पाठवलेले आहेत. दरम्यान, स्वाईन फ्लूबाधीत रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू आहेत. यामध्ये रुग्णाचा मुलगा व मुलीचा समावेश आहे. गावभाग परिसरात ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेले रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे.