पलूस : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचा भौगोलिक आणि राजकीय विस्तार अत्यंत मोठा असून, या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. एकट्या पुणे पदवीधर मतदारसंघात विविध क्षेत्रांतील २५ आमदार काम करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सर्व घटकांनी या निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करणे आवश्यक आहे. २३ तारखेपर्यंत दोन्ही मतदारसंघांतील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर पलूस येथील भाजप कार्यालयात आयोजित आढावा व नियोजन बैठकीत ते बोलत होते.
पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे हे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या दणदणीत विजयासाठी पलूस-कडेगाव मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवून थेट मतदारांपर्यंत पोहोचावे आणि मत नोंदणीपासून ते मतदानापर्यंतचे नियोजन प्रभावीपणे राबवावे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, मतदारसंघ मोठा असल्याने प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संपर्क साधणे आणि पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका मोलाची असून, पक्षाने सोपवलेली जबाबदारी सर्वांनी पार पाडावी. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, पदवीधर व शिक्षक निवडणुकीत पक्षाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांमधील मेळ आणि मतदारांशी थेट संवाद हाच विजयाचा पाया असतो. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी स्थानिक पातळीवर सूक्ष्म नियोजन करून सर्वांनी एकत्रितपणे मैदानात उतरावे.
बैठकीस वसई-विरारचे नगरसेवक गणेश पाटील, भाजप नेते सर्जेराव नलावडे, नगरसेवक अमृत माळी, संदीप मोरे, सागर नलवडे, अजिंक्य पाटील, सुभाष सुतार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे मिलिंद पाटील यांनी स्वागत केले, तर सागर सुतार यांनी आभार मानले.