Poultry Pudhari
सांगली

Poultry Farmers Protest : पोल्ट्रीधारकांचा १ सप्टेंबरला पुण्यात पशुसंवर्धन आयुक्तालयावर मोर्चा

जीआर कागदावरच राहणार असेल, तर शेतकऱ्याने दाद कुठे मागायची? पोल्ट्रीधारकांचा संतप्त सवाल

पुढारी वृत्तसेवा
विजय लाळे

विटा : “शासन निर्णय (जीआर) केवळ कागदावरच राहणार असेल, तर शेतकऱ्याने दाद कुठे मागायची?” असा संतप्त सवाल करत पोल्ट्रीधारकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पोल्ट्रीधारकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १ सप्टेंबर रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयावर तब्बल १० हजार पोल्ट्रीधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने पशुपालक आणि पोल्ट्रीधारकांच्या हितासाठी २२ जुलै २०२४ आणि ३१ जुलै २०२५ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केले होते. मात्र, या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने पोल्ट्रीधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासन निर्णयांची अंमलबजावणी करावी, तसेच पोल्ट्री व्यवसायासंदर्भातील विविध प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

एकतर्फी कराराला विरोध

पोल्ट्री कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर लादले जाणारे एकतर्फी करार थांबवावेत, अशी प्रमुख मागणी आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व पोल्ट्री कंपन्यांसाठी नोंदणीकृत करारनामा बंधनकारक करण्यात यावा. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायात नुकसान झाल्यास त्याचा संपूर्ण आर्थिक भार केवळ शेतकऱ्यांवर पडणार नाही, अशी पोल्ट्रीधारकांची भूमिका आहे.

निकृष्ट पशुखाद्य, औषधांच्या विक्रीवर अंकुशाची मागणी

बाजारात परवान्याशिवाय आणि अनधिकृतपणे विकल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पशुखाद्य व औषधांच्या विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारून अशा बेकायदेशीर विक्रीला तातडीने आळा घालावा, अशी पोल्ट्रीधारकांची मागणी आहे.

पोल्ट्रीला शेतीचा दर्जा द्या

पोल्ट्री व्यवसायाला व्यावसायिक श्रेणीतून वगळून ‘शेती’चा दर्जा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शेतीप्रमाणेच पोल्ट्री व्यवसायाला सवलतीच्या दरात वीजपुरवठा, सौरऊर्जा अनुदान, कर्जावरील व्याजमाफी आणि ग्रामपंचायत करातून विशेष सवलत मिळावी, अशी मागणी आहे. याशिवाय, शासनाच्या पूर्वीच्या निर्णयानुसार पोल्ट्रीधारकांना प्रति किलो मिळणारा दर निश्चित करावा. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एकात्मिक यंत्रणा उभारून पोल्ट्रीधारकांचे आर्थिक शोषण थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आमदार सुहास बाबर मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेणार

दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सुहास बाबर यांनी पोल्ट्रीधारकांचा हा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर ते पुन्हा पोल्ट्रीधारकांच्या विविध मागण्या घेऊन राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची येत्या मंगळवारी भेट घेणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT