सांगली : पोल्ट्री फार्मसाठी 6 कोटी 37 लाखांचे कर्ज देण्याच्या आमिषाने शेतकऱ्यास 13 लाख 71 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी शेतकरी हारूण कासिम मुल्ला यांनी सुनील बाबगोंडा पाटील (रा. कुपवाड रस्ता, सांगली) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हारूण मुल्ला हे म्हैसाळ येथील शेतकरी आहेत. त्यांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्ज आवश्यक होते. सुनील पाटील हा कर्ज मंजूर करून देण्याची कामे करतो, अशी माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. यावेळी सुनील याने हारूण यांना पोल्ट्री व्यवसायासाठी 6 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याला कर्ज मिळाल्यानंतर 6 टक्के कमिशन देण्याचेही ठरले होते.
परंतु कर्ज मंजूर करण्यासाठी प्रोसेसिंग फीची त्याने मागणी केली. यासाठी हारूण यांनी सुनील याला धनादेश, आरटीजीएस आणि रोखीने 13 लाख 71 हजार रुपये 2020 ते 2023 दरम्यान दिले होते. प्रोसेसिंग फी देऊनही कर्ज मंजूर न झाल्याने हारूण यांनी सुनील याच्याकडे प्रोसेसिंगसाठी दिलेल्या रकमेची परत मागणी केली. परंतु त्याने टाळाटाळ सुरू केली. त्याने प्रोसेसिंग फी परत न दिल्याने मुल्ला यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सुनील पाटील याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.