मिरज : मिरज शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या डिजिटल फलकांमुळे पोस्टर वॉर सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अनधिकृतरीत्या लावलेले अनेक डिजिटल फलक महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून हटवण्यात आले. यामध्ये बहुतांश डिजिटल फलक हे भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार इद्रीस नायकवडी यांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून मिरज विधानसभा मतदारसंघात राजकीय शह-काटशह सुरू असून, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. दुसरीकडे आमदार समर्थक हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून एकमेकांचे डिजिटल फलक काढण्यात दंग झाले आहेत. त्यामुळे मिरजेत 'पोस्टर वॉर' रंगल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते आमदार इद्रीस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावण्यात आले होते. मात्र, भाजपच्या एका माजी नगरसेवकाने हे विनापरवाना असलेले डिजिटल फलक काढण्याची तक्रार महापालिकेकडे केली. तक्रार प्राप्त होताच महापालिकेच्या पथकाने कारवाई करत आमदार नायकवडी यांचे फलक हटवले. त्यानंतर मिरज पंचायत समितीत भाजपचे सभापती आणि शिवसेनेचे उपसभापती निवडून आले. या निवडीच्या अभिनंदनपर शहरात लावलेल्या फलकांवर आमदार सुरेश खाडे यांचे फोटो होते. तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आमदार खाडे यांचे फोटो असलेले डिजिटल फलक देखील काढून घेतले. या कारवाईमुळे मिरजेत रंगलेल्या पोस्टर वॉरची शहरभर चर्चा सुरू आहे.