कवठेमहांकाळ : महसूल विभागाने कारवाई करत पकडून आणलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पोलिस ठाण्याच्या आवारातून पोलिस हवालदार राजेंद्र मानवर याने एका निवृत्त कर्मचार्याला हाताशी धरत 50 हजार रुपयांना विकली आहे. या दोषी कर्मचार्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. याबाबतची तक्रार सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे केली असल्याची माहिती शिरढोण येथील जितेंद्र मंडले यांनी दिली आहे.
तक्रारी अर्जात म्हटले आहे की, शिरढोण येथील जितेंद्र मंडले यांची 2022 साली ट्रॉली व ट्रॅक्टर महसूल विभागाने कारवाई करत पोलिस स्टेशन आवारात लावले होते. त्यानंतर मंडले हे ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिस स्टेशनवर आहे का हे वारंवार बघत होतो. मात्र गेल्या महिन्यात ट्रॉली दिसली नाही. म्हणून मंडले यांनी चौकशी केली. यावेळी ट्रॉली पांडेगाव येथील एका इसमाकडे असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे फोनवरून चौकशी केली असता ही ट्रॉली पोलिस हवालदार राजेंद्र मानवर याने एका निवृत्त कर्मचार्याला हाताशी धरून 50 हजार रुपयाला विकली असल्याचे त्या इसमाने सांगितल्याचे मंडले यांनी तक्रारीत म्हटले आहे. अशाप्रकारे अनेक ट्रॅक्टर व ट्रॉली विकल्या असण्याची शक्यता असून माझी ट्रॉली विकणार्या राजेंद्र मानवर याच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारदार जितेंद्र मंडले व पांडेगाव येथील ट्रॉली घेणारा इसम यांच्यात ट्रॅक्टरट्रॉली 50 हजार रुपयाला घेतली असल्याच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्याने पोलिस खाते पुरते बदनाम झाले आहे. महसूल विभागाने कारवाईसाठी लावलेली ट्रॉली पोलिस कर्मचार्यांने विकल्याची तक्रार झाल्यामुळे पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून राजेंद्र मानवर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जितेंद्र मंडले यांनी केली आहे.
पोलिस ठाण्याच्या आवारातून ट्रॅक्टर गेलेला नाही. ट्रॅक्टर हा पोलिस ठाण्याच्या आवारातच आहे. तक्रारदाराला बोलावून त्याच्या तक्रारीचे निरसन करण्यात येणार आहे आणि तक्रारदार व पांडेगाव येथील इसम यांच्यात पोलिसांनी पैसे घेतल्याचे संभाषण असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. त्याची सत्यता पडताळून पाहून योग्य ती कारवाई करण्यात येईल.जोतिराम पाटील, पोलिस निरीक्षक