सांगली ः सांगलीच्या वास्तू वैभवात भर घालणारी पोलिस मुख्यालयाची नवी इमारत पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटला. नव्या इमारतीत पोलिस विभागाचे कामकाजही सुरू झाले. आता या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवार, दि. 23 रोजी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
विश्रामबाग परिसरात 1967 साली पोलिस मुख्यालय उभारण्यात आले. दगडी बांधकाम असलेल्या या इमारतीत सुमारे 55 वर्षे पोलिस प्रशासनाचे कामकाज सुरू होते. पोलिस दलाचा विस्तार झाल्याने नवीन इमारतीची मागणी होत होती. त्यानुसार शासनाकडून नवीन इमारतीला मंजुरी मिळाली. ऑगस्ट 2023 मध्ये नवीन मुख्यालयाचे काम पूर्ण झाले. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले होते. सहा महिन्यांनंतर गृह विभागाची परवानगी घेऊन जुन्या इमारतीतील मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले. त्यानंतरही अनेकदा मुख्यालयाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली. पण मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही. अखेर दोन वर्षांनंतर नव्या इमारतीचे उद्घाटन होत आहे.
23 मेरोजी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी पोलिस दलाकडून तयारी सुरू आहे. मंगळवारी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाची बैठक घेत सूचना केल्या.
तीनमजली इमारत
प्रशस्त पार्किंगची व्यवस्था
54 हजार चौरस फूट बांधकाम
इमारतीसमोर पोलिस स्मृती स्तंभ
पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक, गृह उपअधीक्षकांचे कक्ष, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, सायबर विभाग, पोलिस कल्याण विभाग, पासपोर्ट विभाग, भरोसा सेल, महिला साहाय्यता कक्ष, कॉन्फरन्स हॉल.