मिरज : उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी मिरज दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील पायलट वाहनाच्या चुकीमुळे गोंधळ उडाला. पायलट वाहन आणि सुरक्षा रक्षकांची वाहने एका बाजूला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाहन एका बाजूला गेले. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत मोठा गोंधळ उडाला. हा प्रकार लक्षात येताच अजित पवार यांनी या प्रकरणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत टाकळी रस्त्यावरील एका कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यानंतर अजित पवार यांचा ताफा कार्यकर्ते जमील बागवान, मैनुद्दीन बागवान यांच्या घराकडे गेला. तेथून माजी महापौर किशोर जामदार यांच्या घराकडे जाताना ताफ्यात ही चूक झाली. अजित पवार यांचा ताफा मिरजेतील लक्ष्मी मार्केटमध्ये आल्यानंतर पायलट वाहन आणि सुरक्षा रक्षकांची वाहने महाराणा प्रताप चौकाकडे गेली, तर अजित पवार यांचे वाहन लक्ष्मी पुतळ्याजवळ जाऊन थांबले.
वर्दळीच्या ठिकाणी अचानक उपमुख्यमंत्र्यांचा ताफा थांबल्याने मोठी गर्दी जमली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनासमोर पोलिसांचे एकही वाहन जाऊ शकले नाही. काहीवेळ उपमुख्यमंत्र्यांचे वाहन जागीच थांबले. पण मागील ताफ्यातील पोलिसांचे एकही वाहन पायलट म्हणून पुढे न आल्याने उपमुख्यमंत्र्यांचे वाहन पायलट आणि सुरक्षा रक्षकांच्या वाहनाशिवाय पुढे रवाना झाले. माजी महापौर किशोर जामदार यांच्या घराजवळ पोहोचेपर्यंत त्यांच्या वाहनाच्या पाठीमागे विशेष सुरक्षा आणि मिरज शहर पोलिसांचा ताफा होता.
मिरज वाहतूक शाखेकडील पायलट वाहनामुळे ताफ्यात ही घोडचूक झाल्याचे समोर आले. यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी असणारे विशेष सुरक्षा पथकाचे अधिकारी चांगलेच संतापले. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.